महाविद्यालयीन युवकाचा प्रयत्न

महाराष्ट्राच्या एका कोपऱ्यात विदर्भ मराठवाडय़ासारखा दुष्काळाने होरपळणारा भाग आहे, तर दुसऱ्या बाजूला अव्याहतपणे पाण्याचा अर्निबध वापर करणारा शहरी भागही आहे. तीव्र उन्हाळा आणि धरणांच्या जलाशयातील उपलब्ध पाणीसाठा पुरवून वापरण्याचे आव्हान समोर असले तरी शहरी भागात पाणीबचतीसाठी गांभीर्याने कृती करणारे लोक तुरळक म्हणावेत एवढय़ाच संख्येने आहेत. या पाश्र्वभूमीवर कायद्याचा विद्यार्थी असलेल्या अक्षय ठकारचे प्रयत्न आश्वासक म्हणावेत असे आहेत.

अक्षय मराठवाडा मित्र मंडळाच्या विधी महाविद्यालयात कायद्याचे शिक्षण घेत आहे. शेतकी साहित्याच्या दुकानात मिळणाऱ्या औषध फवारणी यंत्राच्या साहाय्याने चारचाकी गाडी धुतली तर अवघ्या दोन ते अडीच लिटर पाण्यात चारचाकी गाडी स्वच्छ आणि चकचकीत धुवून निघू शकते, इतकेच नव्हे तर या प्रक्रियेत मोठय़ा प्रमाणात पाणी वाचणे शक्य आहे हे अक्षयने स्वत प्रयोग करून अनुभवले आहे.

अक्षय सांगतो, कायद्याचे शिक्षण घेत असल्याने सामाजिक प्रश्नांची नव्याने जाणीव होण्यास सुरुवात झाली आहे. प्रसार माध्यमांतून दिसणाऱ्या दुष्काळ आणि पाणीटंचाईच्या बातम्या आणि दुसरीकडे आपण केवळ आपली चारचाकी धुण्यासाठी वापरलेले चार ते पाच बादल्या पाणी हा विरोधाभास खटकल्याने मी कमीत कमी पाण्यात गाडी धुण्यासाठी काय करता येईल याचा शोध सुरू केला.

शेतातील पिकांवर औषध फवारणी करण्याचे यंत्र वापरून पाहिले तर पाणी वाचेल असे वाटले म्हणून शेतकी साहित्याच्या दुकानातून सोळा लिटर क्षमतेचे फवारणी यंत्र तीन हजार रुपये किमतीला खरेदी केले. १ डिसेंबर २०१८ पासून हे यंत्र गाडी धुण्यासाठी वापरत आहे. त्याच्या टाकीत एकदा पाणी भरले की किमान आठ दिवस रोज गाडी धुण्यासाठी हे पाणी पुरेसे ठरते. पाच महिन्यात किमान चौदा हजार पाचशे वीस लिटर पाणी मी एकटय़ाने वाचवले आहे.

या पद्धतीचा वापर करून देखील गाडी स्वच्छ होते हे पाहून अनेक जण या युक्तीचे कौतुक करतात. मात्र आपल्याकडून पाणी वाया जाते याची बहुदा जाणीव नसल्याने अद्याप हे ‘कॉपी’ करण्यास कोणी सुरुवात केलेली नाही. तरी कोणी कॉपी करून पाणी बचतीला हातभार लावल्यास मला आनंदच वाटेल, असेही अक्षय म्हणाला.