केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची दोन दिवसांपूर्वी भेट झाल्याचे बोलले जात आहे. यावरून राजकीय चर्चांना उधाण आले आहे. राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क लावले जात असल्याचे दिसत आहे. दरम्यान आता या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.

“अशा प्रकारच्या भेटी नेहमीच होत असतात. त्यानुसार गृहमंत्री अमित शाह आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची त्या दिवशी भेट झाली आहे. पण त्या भेटीत नेमकं काय झाले? हे माहिती नाही. भारतीय संस्कृती हेच सांगते की, राजकारण राजकारणाच्या जागी, राजकारणाच्या व्यतिरिक्त आपण भेटलं पाहीजे मात्र महाराष्ट्रात अलीकडच्या काळात वर्ष दीड वर्षांत ते कमी झाले आहे.” असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

“आता तरी रहस्य कथेचा शेवट करा; काही गोष्टी वेळेबरोबर स्पष्ट झाल्या पाहिजे”

तसेच ते पुढे म्हणाले की, “अशा प्रकरची भेट म्हणजे काही राजकीय असेलच असे काही नाही. शरद पवार अहमदाबाद येथे एका कार्यक्रमाला गेले होते व अमित शाह हे प्रवासावरून घरी पोहचले होते. यामुळे त्यांची भेट झाली असेल, पण राष्ट्रवादीकडून सतत सांगितले जात आहे की भेट झालीच नाही, हे सांगण्याची स्पर्धाच लागली आहे. यातून ते भेट झाल्याचे दाखवत आहे. पण भेट झाली आहे. मात्र त्यात काय झालं आहे हे माहिती नाही.”

पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो मान्य असेल –
भविष्यात राष्ट्रवादी सोबत जाण्याचा निर्णय घेतल्यास काय भूमिका राहणार? यावर चंद्रकांत पाटील म्हणाले की, मी एक सच्चा स्वयंसेवक आणि कार्यकर्ता असल्याने पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील ते मान्य करायचं आणि ते पक्षाच्या हिताचे असते. तसेच याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि जे.पी.नड्डा जो निर्णय घेतील तो मान्य असेल, अशी भूमिका चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केली.

हे सरकार पडेल किंवा राहील असे संकेत तुमच्या पर्यंत आले आहेत का? या प्रश्नावर ते म्हणाले की, मला असे कुठलेही संकेत मिळालेले नाहीत. तसेच अमित शाह यांना भेटण्याची वेळ साधारण अशीच रात्री उशीराची असते, ही निवांत वेळ असते.

शरद पवार यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी –
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांना ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यावर चंद्रकांत पाटील म्हणाले , आपल्या हिंदू संस्कृतीनुसार जर कुणीही आजारी असेल तर त्याला लवकर आराम पडावा, यासाठी प्रार्थना करायची असते आणि मी महाराष्ट्रच्या कुलस्वामीनी तुळजाभवानीला प्रार्थना करतो की, शरद पवार यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होऊ दे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.