News Flash

ग्रामीण पोलिसांची बिनतारी संदेश यंत्रणा अद्ययावत

पुणे ग्रामीण पोलीस दलाची बिनतारी संदेश यंत्रणा नुकतीच अद्ययावत करण्यात आली अाहे.

पुणे ग्रामीण पोलिसांची बिनतारी संदेशवहन यंत्रणा अद्ययावत करण्यात आली असून ही यंत्रणा डिजिटल यंत्रणेवर आधारित आहे. या यंत्रणेचे उद्घाटन कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय वर्मा यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी पोलीस अधीक्षक डॉ. जय जाधव, अतिरिक्त अधीक्षक राजकुमार शिंदे, तानाजी चिखले उपस्थित होते.

बिनतारी संदेश यंत्रणा ही पोलीस दलाचा कणा मानली जाते. या यंत्रणेमुळे पोलीस दलातील महत्त्वाच्या आणि गोपनीय संदेशांची देवाण-घेवाण केली जाते. पुणे ग्रामीण पोलीस दलाची बिनतारी संदेश यंत्रणा नुकतीच अद्ययावत करण्यात आली असून नवीन यंत्रणेमुळे संदेशवहन सुस्पष्ट व गतिमान होणार आहे. पुण्यासह, सांगली आणि कोल्हापूर येथील जिल्हा पोलिसांनी या यंत्रणेचा वापर सुरू केला आहे.
बिनतारी संदेश यंत्रणेचा (वायरलेस) वापर पोलीस दलात स्वातंत्र्यपूर्व काळापासून सुरू आहे. एखादी घटना घडल्यानंतर त्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून पोलीस कर्मचाऱ्यापर्यंत त्वरित पोहचविणे या यंत्रणेमुळे शक्य होते. ही यंत्रणा म्हणजे पोलीस दलाचा कणा आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात बिनतारी संदेश वहनासाठी उच्च कंप्रता (हाय फ्रिक्वेन्सी) यंत्रणेचा वापर  करण्यात आला. त्यानंतर सन १९८० च्या सुमारास व्हीएचएफ अॅनोलॉग यंत्रणेचा वापर सुरू झाला. गेले काही वर्ष पोलीस दलात संदेश वहनासाठी याच यंत्रणेचा वापर सुरू आहे. पुणे ग्रामीण पोलिसांची बिनतारी संदेश वहन यंत्रणा गेले काही वर्ष अॅनोलॉग यंत्रणेवर आधारित होते. ही यंत्रणा नुकतीच अद्ययावत करण्यात आली असून नवीन यंत्रणा डिजिटल यंत्रणेवर आधारित आहे, अशी माहिती पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या बिनतारी संदेश वहन विभागाचे पोलीस निरीक्षक सीताराम जाधव यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.
यापूर्वी अॅनोलॉग यंत्रणेच्या माध्यमातून फक्त संदेश वहनाचे काम व्हायचे. आता ही यंत्रणा अद्ययावत करण्यात आली असून डिजिटल यंत्रणेमुळे एसएमएस, घटनास्थळ किंवा गुन्हेगाराचे छायाचित्र तसेच माहितीची देवाण-घेवाण करणे शक्य होईल. बिनतारी संदेश यंत्रणेला संगणक जोडण्यात आला आहे. या यंत्रणेमुळे पोलिसांच्या ज्या वाहनांना जीपीएस यंत्रणा बसवण्यात आली आहे. अशा वाहनांचे लोकेशन (स्थळ) समजण्यास मदत होईल.  ही यंत्रणा अद्ययावत करण्यासाठी ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. जय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सीताराम जाधव, उपनिरीक्षक किशोर म्हेत्रे, बच्छाव यांनी परिश्रम घेतले.
डिजिटल यंत्रणेचा वापर पुणे, कोल्हापूर, सांगली या तीन जिल्ह्य़ातील पोलिसांनी सुरू केला आहे. या यंत्रणेचा प्रारंभ कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय वर्मा यांच्या हस्ते पुणे ग्रामीण पोलिसांच्या चव्हाणनगर येथील मुख्यालयात करण्यात आला. याप्रसंगी पोलीस अधीक्षक डॉ. जय जाधव, अतिरिक्त अधीक्षक राजकुमार शिंदे, तानाजी चिखले उपस्थित होते.

समाजमाध्यमांच्या प्रभावातही वायरलेस बिनतोड
सध्या सर्वच क्षेत्रात समाजमाध्यमांचा वापर सुरू आहे. पोलीस दलातही व्हॉट्सअॅप, फेसबुक या समाजमाध्यमांचा वापर केला जात आहे. घटनास्थळाचे छायाचित्र किंवा माहिती पाठविण्यासाठी पोलीस व्हॉट्सअॅपचा वापर करत आहेत. परंतु पोलीस दलात आजमितीला बिनतारी संदेश यंत्रणा ही अधिकृत आणि विश्वासार्ह मानली जाते. या यंत्रणेचा वापर गोपनीय संदेशांची देवाण-घेवाण तसेच  कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी होतो. त्यामुळे समाजमाध्यमांचा प्रभाव असताना बिनतारी संदेश वहन यंत्रणा बिनतोड ठरली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 6, 2016 3:30 am

Web Title: wireless system for rural police dept
Next Stories
1 शनिवारची मुलाखत : आजची खरी गरज दिशा दाखवणाऱ्यांची..
2 ‘मसाप’ निवडणुकीमध्ये बारकोडचा वापर होणार
3 ओल्या कचऱ्यावर व्हॅनमध्येच प्राथमिक प्रक्रिया!
Just Now!
X