निवडणुकांमध्ये शिवसेना आणि भाजपा यांची युती झाली नाही तर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा पराभव निश्चित होईल असा अंदाज भाजपाचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी वर्तवला आहे. युती झाली नाही तर रावसाहेब दानवे दीड लाख मतांनी पडतील असेही त्यांनी म्हटले आहे.

पिंपरीमध्ये बुधवारी भाजपाची लोकसभा निवडणुकांसंदर्भातली बैठक पार पडली. या बैठकीत रावसाहेब दानवे म्हटले की युतीशिवाय लोकसभा लढलो तरीही राज्यात लोकसभेच्या भाजपाला चाळीस जागा मिळतील. त्यावर युतीची गरज वाटत नाही का? असा प्रश्न दानवे यांना विचारण्यात आला. यावर उत्तर देताना दानवे म्हटले की ते आम्ही ठरवू तुम्ही आमचा पक्ष चालवू नका. दानवे यांच्या या वक्तव्यानंतर दुसऱ्याच दिवशी युती होणं किती महत्त्वाचं आहे हे संजय काकडे यांनी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तसंच युती झाली नाही तर रावसाहेब दानवेंचा पराभव होईल हेदेखील त्यांनी म्हटले आहे.

संजय काकडे यांनी डिसेंबर महिन्यात मोदी सरकारवर टीका केली होती. तसेच गेल्या काही दिवसांमध्ये त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड या नेत्यांच्या भेटी घेतल्या. त्यामुळे राजकीय वर्तुळात काकडे भाजपाला जय श्रीराम करणार का? अशा चर्चा सुरु झाल्या त्याबद्दल विचारले असता मी पक्ष सोडणार नाही असे काकडे यांनी म्हटले आहे.