News Flash

अपंग, ज्येष्ठांसाठीचे राज्यातील पहिले न्यायालय अखेर सुरू

दीड वर्षांपूर्वी केंद्रीय न्याय विधी मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी अपंग आणि ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी स्वतंत्र न्यायालय सुरू करण्याची सूचना दिली होती.

शिवाजीनगर न्यायालयात कामकाज

राज्यातील अपंग आणि ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी विशेष न्यायालय स्थापना करण्याची अधिसूचना जारी झाली होती. त्यानुसार राज्यातील अकरा शहरांत अपंग आणि ज्येष्ठांसाठी विशेष न्यायालय सुरू करण्याची तरतूद करण्यात आली. मात्र, प्रत्यक्षात या न्यायालयांचे कामकाज सुरू झाले नव्हते. अखेर दीड वर्षांच्या पाठपुराव्यानंतर अपंग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठीचे राज्यातील पहिले न्यायालय शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालयात जागतिक अपंग दिनाच्या पाश्र्वभूमीवर नुकतेच सुरू झाले.

राज्यात अपंग आणि ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी स्वतंत्र न्यायालय स्थापन करण्यात यावे, या मागणीचा पाठपुरावा ठाणे जिल्ह्य़ातील कल्याण येथील रहिवासी शंकर साळवे करत होते. साळवे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले असून जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून पुण्यातील शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालयात राज्यातील पहिल्या न्यायालयाचे कामकाज ३ डिसेंबरपासून सुरू झाले. याबाबत साळवे म्हणाले, अपंग आणि ज्येष्ठ नागरिक समाजातील घटक आहेत. बऱ्याचदा त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात येते. मी आणि माझी पत्नी अपंग आहे. एका प्रकरणात आम्ही अपंग कल्याण आयुक्तालयाकडे दाद मागितली होती. तेव्हा हे प्रकरण न्यायालयीन कक्षेत असल्याची माहिती मिळाल्यानंतर अपंगांसाठी विशेष न्यायालय नसल्याची बाब माझ्या निदर्शनास आली होती. अपंगांसाठी स्वतंत्र न्यायालय राज्यात असणे गरजेचे आहे. याबाबत मी चौकशी केली तेव्हा राज्यात अपंगांसाठी स्वतंत्र न्यायालय नसल्याची बाब निदर्शनास आली होती. त्यानंतर मी प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा केला.

दीड वर्षांपूर्वी केंद्रीय न्याय विधी मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी अपंग आणि ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी स्वतंत्र न्यायालय सुरू करण्याची सूचना दिली होती. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यांची एक बैठक पार पडली. त्यानंतर राज्यात अपंग आणि ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी स्वतंत्र न्यायालय सुरू करण्याची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली. २०१६ मध्ये अपंगांसाठीच्या कायद्यात काही तरतुदी करण्यात आल्या होत्या. अधिसूचनेत मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबाद, सातारा, सांगली, लातूर, परभणी, नागपूर येथील न्यायालयात विशेष न्यायालय सुरू करण्याचे नमूद करण्यात आले होते. अधिसूचना जारी झाल्यानंतर राज्यात अपंग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष न्यायालयाचे कामकाज सुरू झाले नव्हते. अपंगांसाठीच्या पहिल्या न्यायालयाचे कामकाज शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालयात नुकतेच सुरू झाले, असे साळवे यांनी सांगितले.

ज्येष्ठ नागरिकांना दिलासा

पुणे,मुंबई शहरात मोठय़ा संख्येने ज्येष्ठ नागरिक एकटे राहतात. संपत्तीचा वाद तसेच नातेवाईकांकडून ज्येष्ठांना त्रास देण्याच्या घटना घडतात. ज्येष्ठ नागरिकांनी न्यायालयात तक्रार दाखल केल्यानंतर त्यांच्या तक्रारीचा निपटारा करण्यासाठी स्वतंत्र न्यायालय सुरू झाल्यामुळे त्यांना दिलासा मिळाला आहे. सहा महिन्यांच्या आत ज्येष्ठ नागरिक आणि अपंगांच्या तक्रारींचे निराकरण करण्यात येणार आहे.

विशेष सुविधा, सहा महिन्यात निकाल

अपंग आणि ज्येष्ठांसाठी सुरू करण्यात आलेल्या न्यायालयात ये-जा करण्यासाठी स्वतंत्र मार्ग (रॅम्प) असावा, असे अधिसूचनेत नमूद करण्यात आले होते. तक्रार दाखल झाल्यानंतर सहा महिन्यात निकाल देण्यात यावा, असे म्हटले आहे. शिवाजीनगर जिल्हा न्यायालयात तळमजल्यावर अपंग न्यायालय असून न्यायाधीशपदी वाघमारे यांची नेमणूक करण्यात आली आहे.अपंग न्यायालयात विशेष न्यायाधीश, कनिष्ठ लिपिक, टंकलेखक, शिपाई यांची नेमणूक करण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 12, 2019 12:49 am

Web Title: work in shivajinagar court akp 94
Next Stories
1 सामान्यांना आनंद देण्यासाठीच चित्रपटसृष्टीत काम
2 शिरूर मतदारसंघातील प्रश्नांसाठी आढळरावांचे मुख्यमंत्र्यांना साकडे
3 कर्तृत्ववान नेता
Just Now!
X