जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून डी. एस. कुलकर्णी फाउंडेशनतर्फे पुणेकरांना दोन हजार रोपांचे वाटप करण्यात आले.

ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांना पहिले रोप देऊन या उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. फाउंडेशनचे कार्याध्यक्ष श्याम भुर्के, सुनील महाजन, प्रमोद आडकर आणि डीएसके डेव्हलपर्सचे मनीष खाडिलकर या वेळी उपस्थित होते. फाउंडेशनतर्फे गेल्या दहा वर्षांपासून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याचप्रमाणे मोकळ्या जागेवर फाउंडेशनतर्फे वृक्षारोपण करण्यात येते. आतापर्यंत ६५ हजार झाडे लावण्यात आली आहेत.

निसर्ग जपणे हे दैवी कार्य आहे. प्रत्येकाने आपल्या परीने निसर्गाची सेवा करायला हवी, अशी भावना मंगेश तेंडुलकर यांनी व्यक्त केली. प्रत्येकाने एक तरी झाड लावून त्याची जोपासना करावी, असे आवाहन श्याम भुर्के यांनी केले. सकाळी किंवा सायंकाळी झाडाला पाणी घालण्याची  सवय लावली, तर आपण खूप मोठा बदल घडवू शकतो, असेही त्यांनी सांगितले. पंडित पाटील यांनी आभार मानले.