सगळीकडे राजकारण फोफावले आहे. मात्र, त्यात न पडता आजही अनेक आदर्श गावे घडवली जाऊ शकतात. त्यासाठी श्रमदानाची व इच्छाशक्तीची गरज आहे, असे मत हिवरेबाजारचे प्रणेते पोपटराव पवार यांनी चिंचवड येथे बोलताना व्यक्त केले. बिघडलेला गाव पूर्वीप्रमाणे करण्याची प्रेरणा घेऊन सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने हिवरेबाजार आदर्श गाव घडवू शकलो, असेही ते म्हणाले.
यशवंतराव चव्हाण यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा ‘यशवंत-वेणू पुरस्कार’ पोपटराव व शोभा पवार यांना ज्येष्ठ समाजवादी विचारवंत भाई वैद्य यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या वेळी सत्काराला उत्तर देताना पवार म्हणाले,‘‘ यशवंतराव चव्हाण यांचा आदर्श घेऊनच घडलो. त्यामुळे त्यांच्या नावाच्या पुरस्कारामुळे भारावून गेलो आहे. श्रमदान हाच आमचा आत्मा आहे. गेली २६ वर्षे हिवरेबाजारातील ग्रामस्थ श्रमदान करत आहेत. निव्र्यसनी मुले हीच कुटुंबांची संपत्ती आहे. मुलांना चांगले संस्कार देणाऱ्या शाळांची गरज आहे.’’  या वेळी संदीप घारे, संदीप थिटे, प्रिती फुगे यांनाही सन्मानित करण्यात आले. दिगंबर ढोकले यांनी सूत्रसंचालन केले. मुकुंद आवटे यांनी आभार मानले.