सात हजार वृक्षांची लागवड करणार

महामेट्रोतर्फे सात हजार वृक्षांचे रोपण करण्यात येणार असून पुणे मेट्रोच्या ‘ग्रीन इनिशिएटिव्ह’ अंतर्गत ही वृक्षारोपण मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी दिली. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत महामेट्रोतर्फे आकुर्डी रेल्वे स्टेशनजवळील सेक्टर २९ येथील पाच एकर जागेत वृक्षारोपण करण्यात आले, या वेळी डॉ. दीक्षित बोलत होते.

‘पुणे मेट्रो ही पर्यावरणपूरक व्हावी यासाठी आम्ही प्रयत्नशील असून याअंतर्गत ‘ग्रीन इनिशिएटिव्ह’ उपक्रम हाती घेतला आहे. पुणे मेट्रोच्या कामादरम्यान विकास आराखडय़ानुसार (डीपीआर) ६८५ झाडांचे नुकसान होणार असून येत्या काळात एका झाडाच्या बदल्यात दहा याप्रमाणे सात हजार वृक्षांचे रोपण करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. त्यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड भागातील १३७ टन कार्बन डायऑक्साईड वायूचे उत्सर्जन कमी होण्यास मदत होईल. पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्यात ६५ टक्के ऊर्जा म्हणजे १७ ते १८ मेगाव्ॉट वीज सौरऊर्जेच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात येणार आहे. अशा प्रकारे पर्यावरणाचे संवर्धन करणारे नागपूर आणि पुणे मेट्रो हे देशातील उल्लेखनीय प्रकल्प असतील,’ असेही डॉ. दीक्षित यांनी सांगितले.

‘सोलर प्लस वन’ या बॅटरीवर चालणाऱ्या प्रातिनिधिक फीडर कारचे उद्घाटन डॉ. दीक्षित यांच्या हस्ते करण्यात आले. याविषयी अधिक माहिती देताना डॉ. दीक्षित म्हणाले, ‘सोलर प्लस वन ही फीडर सेवा देणारी कार असून ८१ किमी प्रती तास या वेगाने धावू शकेल. या कारची बॅटरी पाच तास सौरऊर्जेवर चार्ज करावी लागणार असून कारच्या छतावर पीव्ही सेल्स बसविण्यात आले आहेत. अशा प्रकारच्या गाडय़ा पुणे मेट्रोला लागणाऱ्या सेवेसाठी वापरण्याची योजना आहे.’ पुणे मेट्रोचे काम सुरू होत असतानाच सुरूवातीपासूनच पर्यावरणपूरक अपारंपारिक ऊर्जेच्या वापरावर भर देण्यात येणार आहे. तसेच मेट्रोच्या प्रत्येक डेपोमध्ये सौरऊर्जेच्या माध्यमातून ऊर्जानिर्मिती करण्याचा प्रयत्न करणार आहोत. याशिवाय पावसाच्या पाण्याचा पुनर्वापर, ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी आवाज आणि कंप अडथळे यांचा वापर आम्ही करू,’ असेही डॉ. दीक्षित यांनी या वेळी नमूद केले.

मिटकॉनच्या पर्यावरण व्यवस्थापन आणि अभियांत्रिकी विभागाचे व्यवस्थापकीय उपाध्यक्ष डॉ. संदीप जाधव, राईट्सच्या  शहरी वाहतूक आणि शहरी अभियांत्रिकी विभागाचे संघव्यवस्थापक बी. व्ही. मल्लिकार्जुन राव यांनी पुणे मेट्रोचे पर्यावरण मूल्यांकन सर्वेक्षण सादर केले. महामेट्रोच्या धोरणात्मक नियोजन विभागाचे व्यवस्थापकीय संचालक रामनाथ सुब्रमण्यम्, सल्लागार समितीचे शशिकांत लिमये, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणचे व्यवस्थापकीय संचालक सतीश खडके यांची प्रमुख उपस्थिती होती.