पुणे : दुचाकीस्वार तरुणाच्या अपघाती मृत्यू प्रकरणात तरूणाच्या कुटुबीयांना एक कोटी ४० लाख रूपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश देण्यात आले. मध्यस्थीने यशस्वी समुपदेशन केल्याने दावा १४ महिन्यात निकाली निघाला.

पराग विजय कुलकर्णी असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वार तरुणाचे ना आहे. १० जानेवारी २०२३ रोजी पराग बुलेटवरुन बिबवेवाडी भागातून निघाले होते. त्यावेळी समोरून आलेल्या ट्रकने बुलेटस्वार पराग यांना धडक दिली. अपघातात पराग यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणाचा तपास करून पोलिसांनी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते.

हेही वाचा >>>जाहिरात फलकांची छाया जीवघेणी…. पुण्यात किती जाहिरात फलक अनधिकृत ?

पराग यांची पत्नी स्नेहल, वडील विजय यांंनी टाटा एआयजी जनरल इन्शुरन्स कंपनीविरुद्ध नुकसान भरपाईचा दावा मोटार अपघात न्यायप्राधिकरणात दाखल केला होता. पराग एका नामांकित कंपनीत कामाला होते. त्यांना दरमहा ७५ हजार रुपये वेतन होते. त्यांच्यावर पत्नी, मुलगी आणि वडील अवलंबून होते. त्यामुळे दीड कोटी रुपये भरपाई देण्याची मागणी दाव्याद्वारे करण्यात आली होती. याप्रकरणाची सुनावणी जिल्हा न्यायाधीश जे, जी, डोरले यांच्या न्यायालयात झाली. त्यानंतर दावा मध्यस्थीसाठी ॲड. अतुल गुंजाळ यांच्याकडे पाठविण्यात आला. अर्जदार आणि विमा कंपनीत यशस्वी तडजोड झाली.