पहिली ते चौथीच्या पाठय़पुस्तकांत बदल होणार

पहिली ते बारावी या अभ्यासक्रमांत एकसंधता येण्यासाठी नेमण्यात आलेल्या अभ्यास मंडळात अवघ्या दीड वर्षांत बदल करण्याचा खटाटोप शिक्षण विभागाने सुरू केला आहे. काही सदस्य ‘सक्षम’ नसल्यामुळे मंडळात बदल करण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाचे म्हणणे आहे. त्याचप्रमाणे ‘आताच्या पाठय़पुस्तकांतून मुले शिकलीच नाहीत,’ म्हणून पहिली ते चौथीच्या पाठय़पुस्तकांतही बदल करण्यात येणार आहेत.

अभ्यासक्रम, पाठय़पुस्तके यांत एकसंधता यावी यासाठी दीड वर्षांपूर्वी एकच अभ्यास मंडळ तयार करण्यात आले. मात्र त्यानंतर एका इयत्तेचे नवे पुस्तक लागू होण्यापूर्वीच अभ्यास मंडळे बदलण्याचा घाट शिक्षण विभागाने घातला आहे. मराठी आणि गणित विषयाची मंडळे बदलण्यात येणार आहेत. तज्ज्ञ म्हणून अभ्यास मंडळावर निवड करण्यात आलेल्यांपैकी काही सदस्य हे ‘अक्षम’ असल्याचा  साक्षात्कार अचानक अभ्यास मंडळाला झाला आहे. त्यामुळे या सदस्यांच्या ऐवजी नवे सदस्य नेमण्याची प्रक्रिया विद्या प्राधिकरणाकडून सुरू करण्यात आली आहे. यासाठी   प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर  या दोन विषयांतील तज्ज्ञांनी अभ्यास मंडळावर येण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन  करण्यात आले आहे. प्रथम भाषा मराठी आणि गणिताच्या पाठय़पुस्तकात संरचनात्मक बदल करण्यात येणार असल्याचे  प्राधिकरणाने म्हटले आहे. मंडळात वारंवार बदल करण्यात येणार असल्याचेही शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले . मात्र त्यामुळे एकच अभ्यास मंडळ तयार करण्यामागे असलेल्या ‘एकसंध अभ्यासक्रम’ तयार करण्याच्या मूळ हेतूचे काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

पाठय़पुस्तके  बदलणार

राज्यातील अभ्यासक्रम आराखडय़ाला सात वर्षे झाली, तरीही या अभ्यासक्रमावरील पाठय़पुस्तकांचाच घोळ अजून संपलेला नाही. राज्यात सध्या २०१० चा अभ्यासक्रम आराखडय़ानुसार दरवर्षी टप्प्याटप्प्याने नवी पाठय़पुस्तके लागू होत आहेत. त्यानुसार यंदा सातवीची नवी पुस्तके लागू होणार आहेत. मात्र आता पुढच्यावर्षी पहिली ते चौथीच्या पाठय़पुस्तकांतही काही बदल करण्यात येणार आहेत. सध्याच्या पाठय़पुस्तकांतून मुले आवश्यक ते शिकली नाहीत, म्हणून पाठय़पुस्तके बदलण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाचे म्हणणे आहे.

काहीच सदस्य बदलण्यासाठी सगळ्यांना अर्ज करण्याची सूचना अभ्यास मंडळातील काहीच सदस्य बदलण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागातून सांगण्यात येत आहे. मात्र, अभ्यास मंडळात राहण्यासाठी सध्या असलेल्या सदस्यांनीही अर्ज करणे आवश्यक असणार आहे. त्याचप्रमाणे या नव्या प्रक्रियेची माहितीदेखील अभ्यास मंडळातील ठरावीक सदस्यांनाच आहे. सदस्यांना याबाबत पत्रेही देण्यात आलेली नाहीत.

सदस्य अक्षम, पुस्तके निरुपयोगी

सध्या अस्तित्वात असलेल्या अभ्यास मंडळातील काही सदस्य हे सक्षम नाहीत. त्यामुळेच या सदस्यांना बदलण्यात येणार आहे. अभ्यास मंडळे पूर्णपणे न बदलता काहीच सदस्य बदलण्यात येतील. मराठी आणि गणित हे मूलभूत विषय असल्यामुळे आधी त्याच्या मंडळात बदल होतील. त्यानंतर इतर विषयांचा विचार केला जाईल. सदस्य निवडीचे निकष अजून निश्चित झालेले नाहीत. मात्र ते पूर्वीपेक्षा अधिक चांगले असतील. पहिली ते चौथीची पुस्तकेही बदलण्यात येणार आहेत. आधीच्या मंडळाने काय केले माहित नाही, मात्र या पुस्तकांवरून मुले अपेक्षित गोष्टी शिकत नसल्याचे दिसते. त्यामुळे पुस्तकांत काही बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काहीच सदस्य बदलण्यात येणार आहेत. कुणाही विशिष्ट सदस्यांना बदलण्याचा उद्देश नाही.’

नंदकुमार, प्रधान सचिव, शालेय शिक्षण विभाग