पुणे: पुरंदर विमानतळासाठी भूसंपादनासाठीचे मोबदला सूत्र निश्चित झाल्यानंतर विमानतळासाठी जागा देण्याची तयारी शंभर जणांनी दर्शविली आहे. त्यांना मोबदल्याच्या सूत्रानुसार ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वानुसार जागा दिली जाणार आहे.

पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी सहमतीने जमिनी देणाऱ्यांना ‘प्रथम येणाऱ्यांना प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर ‘एरोसिटीत’ एकूण जमिनीच्या दहा टक्के विकसित भूखंडांचे वाटप करण्यात येणार आहे. त्यासाठी विमानतळाच्या परिसरात सुमारे सातशे एकर जागा राखीव ठेवण्यात येणार आहे. विमानतळाच्या भूसंपादनासाठीची संमतिपत्रे घेण्याची प्रक्रिया जिल्हा प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे. त्यामध्ये ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ तत्त्वानुसार संमती स्वीकारली जाणार असून, त्यानुसार भूखंडाचेही वाटप केले जाणार आहे.

ज्या शेतकऱ्यांना भूखंड देण्यास समंती द्यायची आहे, त्यांच्याकडून संमतीपत्रे भरून घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय तसेच सासवड येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयांत संमती पत्रे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आतापर्यंत पुरंदर तालुक्यातील सात गावांतून सुमारे १०० जणांनी संमती दिली असून, त्यातून ५० हेक्टर जमीन (सुमारे १२५ एकर) देण्याची संमती मिळाली आहे. त्यामुळे आणखी संमती देण्याऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

पुरंदर विमानतळासाठी कुंभारवळण, एखतपूर, उदाचीवाडी, मुंजवडी, खानवडी, पारगाव मेमाणे, वनपुरी या सात गावांतून २ हजार ६७३ हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार आहे.

भूखंड वाटपाचा निर्णय एमआयडीसीकडे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुरंदर विमानतळासाठी भूसंपादन करताना प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर भूखंडाचे वाटप करण्यात येणार आहे. भूखंडाचे वाटप करताना कशापद्धतीने करायचे, औद्योगिक , वाणिज्यिक, निवासी प्रयोजनासाठी वाटप करताना संबंधित जमीन मालकांना कोणत्या ठिकाणी जमीन द्यायची याबाबतचा निर्णय महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) घेणार आहे. एमआयडीसीला याबाबत नियोजन अधिकारी म्हणून दर्जा प्राप्त करण्यात आला आहे.