पुणे विभागात सर्वाधिक १०७, तर मुंबईत २५ सापळे
पुणे : राज्याची राजधानी आणि सर्वाधिक महत्त्वाची शासकीय कार्यालये असणाऱ्या मुंबईमध्ये लाचखोरांना जाळ्यात पकडण्यासाठी मागील सात महिन्यांत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला (एसीबी) केवळ २५ सापळे लावता आले आहेत. पुणे विभागाने याच कालावधीत सर्वाधिक तब्बल १०७ सापळे लावून लाचखोरांना बेडय़ा ठोकल्या आहेत. मुंबईच्या तुलनेत पुण्यासह ठाणे, नाशिक, नागपूर, अमरावती, औरंगाबाद आदी विभागांतील ‘एसीबी’ची कामगिरीही उजवी ठरली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती, औरंगाबाद, नांदेड हे प्रमुख विभाग आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे विभागात पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर या जिल्हय़ांचा समावेश होतो. ‘एसीबी’च्या आकडेवारीची पाहणी केली तर राज्यातील अन्य विभागांपेक्षा पुणे विभागात लाचखोरांवर कारवाई करण्याचे प्रमाण अधिक आहे. याबाबत ‘एसीबी’च्या पुणे विभागाचे पोलीस अधीक्षक संदीप दिवाण म्हणाले, गेल्या काही वर्षांपासून पुणे विभागात ‘एसीबी’कडून लाचखोरांना पकडण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात आल्या आहेत. ग्रामीण भागात जनजागृती मोहीम राबविण्यात आली आहे. ‘एसीबी’ने छोटी कार्ड तयार केली आहेत. या कार्डवर ‘एसीबी’चा टोल फ्री क्रमांक देण्यात आला आहे, तसेच लाच मागितल्यास त्वरित तक्रार करा, असे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी ‘एसीबी’कडून सातत्याने प्रयत्न सुरू असतात. त्यामुळे राज्यातील अन्य विभागांच्या तुलनेत सरकारी अधिकाऱ्याने लाच मागितल्यास त्वरित तक्रार दाखल होतात. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या टोल फ्री क्रमांकावर (१०६४) आलेल्या प्रत्येक तक्रारीची दखल घ्यायची, अशा सूचना पुणे विभागातील अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
तक्रारदाराला विश्वास देण्याचे काम केले जात असल्याने पुणे विभागात लाचखोरांना पकडण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे, असे निरीक्षण पोलीस अधीक्षक दिवाण यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना नोंदविले.
लाचखोरांना पकडण्यासाठी सापळा लावल्यानंतर त्याच्यावर कारवाई केली जाते. त्यानंतर न्यायालयीन प्रक्रिया सुरू होते. ‘एसीबी’ पुणे विभागातील अधिकारी न्यायालयीन प्रक्रिया पार पाडण्यासाठी कार्यवाही करतात. त्यात काही तांत्रिक अडचणी असतील तर त्या दूर केल्या जातात. तक्रारदाराचा विश्वास गमवायचा नाही, असे धोरण राबविल्याने ‘एसीबी’च्या पुणे विभागात तक्रारदारांची संख्या वाढत आहे.
– संदीप दिवाण, पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे
कारवाई (२५ जुलैपर्यंत)
विभाग सापळा
मुंबई २५
ठाणे ५७
पुणे १०७
नाशिक ४६
नागपूर ७६
अमरावती ६७
औरंगाबाद ६१
नांदेड ५३
