scorecardresearch

पुणे : एक लाख रुग्णांचे वाचले प्राण! १०८ रुग्णवाहिका सेवेचा नागरिकांना लाभ

राज्यातील रुग्णांना आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या १०८ रुग्णवाहिका सेवेमुळे गेल्या वर्षभरात लाखो रुग्णांचे जीव वाचवणे शक्य झाले आहे.

पुणे : एक लाख रुग्णांचे वाचले प्राण! १०८ रुग्णवाहिका सेवेचा नागरिकांना लाभ
संग्रहित छायाचित्र

पुणे : राज्यातील रुग्णांना आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या १०८ रुग्णवाहिका सेवेमुळे गेल्या वर्षभरात लाखो रुग्णांचे जीव वाचवणे शक्य झाले आहे. जानेवारी ते डिसेंबर २०२२ या कालावधीत पुणे जिल्ह्यातील एक लाख १७ हजार ५२८ रुग्णांना १०८ रुग्णवाहिका सेवेचा उपयोग झाला आहे. हृदयविकाराचे रुग्ण, अपघातग्रस्त व्यक्ती ते गर्भवती महिला अशा अनेकांचा यामध्ये समावेश आहे.

जानेवारी २०२२ ते डिसेंबर २०२२ या एक वर्षाच्या कालावधीत महाराष्ट्र अत्यावश्यक वैद्यकीय सेवा विभागाच्या १०८ रुग्णवाहिकेने एक लाख १७ हजार ५२८ रुग्णांना वैद्यकीय मदत उपलब्ध करून दिली आहे. ही संख्या महिन्याला सरासरी ९,८०० रुग्ण एवढी आहे. अपघातात जखमी झालेले रुग्ण, आगीसारख्या घटनांमध्ये भाजलेले रुग्ण, हृदयरुग्ण, उंचावरून पडून जखमी झालेले, विषबाधा झालेले, एखाद्या आपत्तीत झालेली सामूहिक इजा (मास कॅज्युअल्टी), गर्भवती महिला, आत्महत्येसारखे प्रयत्न करणाऱ्या व्यक्ती अशा अनेकांना या सेवेचा उपयोग झाला आहे.

हेही वाचा – पुणे जिल्ह्यात ७४ हजार नवीन मतदार, हडपसर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक ११ हजार मतदार वाढले

कोणाला उपयोग झाला?

१०८ रुग्णवाहिका सेवेचे पुणे जिल्हा समन्वयक डॉ. प्रियांक जावळे म्हणाले, खेड्यापाड्यातील तसेच अगदी शहरी भागातील रुग्णांनाही तातडीने वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणे आणि रुग्णालयापर्यंत पोहोचवणे अशा दोन प्रकारचे काम १०८ रुग्णवाहिका सेवेमार्फत केले जाते. २०२२ मध्ये एक लाखांवर रुग्णांसाठी आणि महिन्याला सरासरी ९८०० रुग्णांसाठी या सेवेचा लाभ करून देणे हे महाराष्ट्र अत्यावश्यक वैद्यकीय सेवा विभागासाठी समाधानकारक आहे. १०८ हा क्रमांक मोफत मदत क्रमांक असल्यामुळे कोणीही १०८ वर संपर्क साधून रुग्णवाहिकेची मागणी करू शकतो, त्यामुळे जिल्ह्यातील तळागाळातल्या घटकांपर्यंत १०८ चा लाभ पोहोचवणे शक्य होते. रुग्णवाहिकेत एक डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी असल्याने रुग्णालयात पोहोचेपर्यंत सर्व प्रकारचे तातडीचे उपचार या रुग्णवाहिकेत मिळतात, याकडेही डॉ. जावळे यांनी लक्ष वेधले. गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक, दहीहंडीसारख्या गर्दीच्या ठिकाणीही अनेकांना १०८ रुग्णवाहिकेचा उपयोग झाला आहे.

रुग्णवाहिका कशी उपलब्ध होते?

राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत १०८ रुग्णवाहिका सेवा ही तातडीच्या उपचारांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. १०८ या मोफत मदत क्रमांकावर (टोल फ्री क्रमांकावर) संपर्क साधून ही रुग्णवाहिका मागवणे शक्य आहे. १०८ च्या सुसज्ज आणि अद्ययावत नियंत्रणकक्षाद्वारे नजीकच्या रुग्णवाहिकेला रुग्णापर्यंत पोहोचण्यास मदत केली जाते. त्यामुळे कमीत कमी वेळात प्राथमिक, तसेच अनेकदा अगदी तातडीचे उपचारही १०८ मध्ये उपलब्ध झाल्याने रुग्णांचा जीव वाचतो.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-01-2023 at 14:42 IST

संबंधित बातम्या