पुणे : अंतर्गत मूल्यमापनामुळे जवळपास सर्वच विद्यार्थी गेल्या वर्षी उत्तीर्ण झाल्यानंतर यंदा दहावीच्या पारंपरिक पद्धतीनं झालेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल राज्य मंडळाने शुक्रवारी जाहीर केला. यंदा राज्याचा निकाल ९६.९४ टक्के लागला. गतवर्षीच्या अंतर्गत मूल्यमापनाद्वारे जाहीर केलेल्या निकालाच्या तुलनेत यंदाचा निकाल घटला असला, तरी २०२० मध्ये झालेल्या प्रत्यक्ष परीक्षेच्या तुलनेत यंदाच्या निकालात १.६४ टक्के वाढ झाली. गेल्या वर्षीच्या निकालाचा अपवाद वगळता यंदाचा निकाल आतापर्यंतचा विक्रमी आहे. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यंदा शंभर टक्के आणि नव्वद टक्क्यांहून अधिक गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांची काही प्रमाणात संख्या घटली असून, शंभर टक्के गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांपैकी सर्वाधिक ७० विद्यार्थी लातूर विभागातील आहेत.

राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत निकाल जाहीर केला. मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले या वेळी उपस्थित होते. करोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या वर्षी परीक्षा न होता विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन करून निकाल जाहीर करण्यात आला होता. यंदा परीक्षा होणार की नाही या बाबत साशंकता होती. मात्र करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने पारंपरिक ऑफलाइन पद्धतीने परीक्षा घेण्याची भूमिका घेऊन राज्य मंडळाने परीक्षेचे नियोजन केले. तसेच विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी शाळा तेथे परीक्षा केंद्र, परीक्षेसाठी अधिकचा वेळ अर्धा तास, ७५ टक्के अभ्यासक्रमावर परीक्षा अशा विविध उपाययोजना करण्यात आल्या.

 गेल्या वर्षी अंतर्गत मूल्यमापनाद्वारे जाहीर केलेल्या निकालात ९५७ विद्यार्थ्यांना शंभर टक्के गुण, १ लाख ४ हजार ६३३ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले होते. तर २०२० मध्ये झालेल्या परीक्षेत २४२ विद्यार्थ्यांना शंभर टक्के गुण आणि ८३ हजार २६२ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले होते. त्यामुळे गुणवंतांचा टक्का घटल्याचे चित्र आहे. २०१७ मध्ये ४८ हजार ८७० विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले होते. त्यामुळे यंदा ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाण जवळपास दुप्पट झाल्याचे दिसून येते. गेल्या वर्षी जवळपास दोन लाख २० हजार विद्यार्थ्यांनी सवलतीच्या अतिरिक्त गुणांचा लाभ घेतला होता. यंदा १ लाख ६४ हजार ७९८ विद्यार्थ्यांना सवलतीचे गुण मिळाले.

दहावीच्या परीक्षेवेळी करोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला असला, तरी परिस्थिती आव्हानात्मक होती. विद्यार्थ्यांनी या आव्हानात्मक परिस्थितीला सामोरे जात परीक्षा दिली ही महत्त्वाची बाब आहे. सर्व घटकांच्या सहकार्यामुळे दहावीच्या परीक्षेचे आयोजन करणे शक्य झाले. पुढील परीक्षा पूर्ण अभ्यासक्रमावर आणि पारंपरिक पद्धतीनेच आयोजित करण्यात येईल.

– शरद गोसावी, अध्यक्ष, राज्य मंडळ

पाच वर्षांत दुप्पट 

राज्यभरातील ८३ हजार ६० विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत. तर २०१७ मध्ये ४८ हजार ८७० विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळाले होते. त्यामुळे २०१७ ते २०२२ या पाच वर्षांतील पारंपरिक पद्धतीने झालेल्या परीक्षेत ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाण जवळपास दुप्पट झाल्याचे दिसून येते.

दृष्टिक्षेपात..

नोंदणी केलेले नियमित विद्यार्थी – १५ लाख ८४ हजार ७९०

परीक्षा दिलेले नियमित विद्यार्थी – १५ लाख ६८ हजार ९७७

उत्तीर्ण झालेले नियमित विद्यार्थी – १५ लाख २१ हजार ३

निकालाची टक्केवारी – ९६.९४

पुनर्परीक्षार्थी नोंदणी – ५४ हजार १५९

परीक्षा दिलेले पुनर्परीक्षार्थी – ५२ हजार ३५१

उत्तीर्ण झालेले पुनर्परीक्षार्थी – ४१ हजार ३९०

पुनर्परीक्षार्थीच्या उत्तीर्णतेची टक्केवारी – ७९.०६

खासगी विद्यार्थी नोंदणी – २१ हजार ५३०

परीक्षा दिलेले खासगी विद्यार्थी – २० हजार ५९८

उत्तीर्ण झालेले खासगी विद्यार्थी – १७ हजार ३५१

खासगी विद्यार्थ्यांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी – ८४.२३

नियमित आणि पुनर्परीक्षार्थी एकत्रित निकालाची टक्केवारी – ९६.३६

उत्तीर्ण झालेले अपंग विद्यार्थी – ८ हजार २९

अपंग विद्यार्थ्यांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी – ९४.४० टक्के

परीक्षेसाठीचे उपलब्ध विषय – ६६

१०० टक्के निकाल लागलेले विषय – २४

उत्तीर्ण मुले – ९६.०६ टक्के

उत्तीर्ण मुली – ९७.९६ टक्के

७५ टक्क्यांहून अधिक गुण मिळालेले विद्यार्थी – २ लाख १० हजार ७५८

सवलतीचे गुण मिळालेले विद्यार्थी – १ लाख ६४ हजार ७९८

एटीकेटी मिळालेले विद्यार्थी – १९ हजार ७१३

निकाल राखून ठेवलेले विद्यार्थी – १५

गैरप्रकारांची कमी नोंद

यंदा बारावीच्या परीक्षेप्रमाणे दहावीच्या परीक्षेवेळीही गैरप्रकारांमध्ये घट झाल्याचे दिसून आले. दहावीच्या परीक्षेत एकूण ११२ गैरप्रकारांची नोंद झाली. तर २०२० मध्ये ५८९ गैरप्रकार नोंदले गेले होते. शाळा तेथे परीक्षा केंद्र या तत्त्वानुसार झालेल्या यंदाच्या परीक्षेत शाळास्तरावर विद्यार्थ्यांना मोकळीक देण्यात आल्याने गैरप्रकार कमी प्रमाणात नोंदवले गेल्याने घट झाल्याचे शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

गुणवंतांचा लातूर पॅटर्न

यंदाच्या निकालात कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९९.२७ टक्के, तर नाशिक विभागाचा निकाल सर्वात कमी ९५.९० टक्के आहे. राज्यातील १२२ विद्यार्थ्यांना शंभर टक्के गुण मिळाले. त्यातील सर्वाधिक ७० विद्यार्थी लातूर विभागातील आहेत. तर ८३ हजार ६० विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत.

पाच वर्षांच्या निकालाचा आढावा

२०१८   ८९.४१ टक्के

२०१९   ७७.१० टक्के

२०२०   ९५.३० टक्के

२०२१   ९९.९५ टक्के

२०२२   ९६.९४ टक्के

विभागीय मंडळनिहाय..

९६.९६% पुणे

९७% नागपूर

९६.३३% औरंगाबाद</p>

९६.९४% मुंबई

९८.५०% कोल्हापूर</p>

९६.८१% अमरावती</p>

९५.९०% नाशिक

९७.२७% लातूर

९९.२७% कोकण