पुणे, पिंपरी चिंचवड, मुंबई महानगर क्षेत्र, नाशिक, अमरावती आणि नागपूर या महापालिका क्षेत्रातील अकरावीच्या केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत ३० मेपासून प्रवेश अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. एप्रिलमध्ये जाहीर केलेल्या संभाव्य वेळापत्रकात बदल करून नवीन वेळापत्रक शिक्षण विभागाने शनिवारी जाहीर केले असून, २३ ते २७ मे या कालावधीत विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरण्याचा सराव करता येईल. 

माध्यमिक शिक्षण संचालक महेश पालकर यांनी प्रवेश प्रक्रियेचे परिपत्रक जाहीर केले. दरवर्षी दहावीचा निकाल जाहीर झाल्यावर अकरावीची प्रवेश प्रक्रिया जाहीर होते. मात्र यंदा निकाल जाहीर होण्यापूर्वीच अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची तयारी करण्यात आली आहे. एप्रिलमध्ये जाहीर केलेल्या संभाव्य वेळापत्रकानुसार १७ मेपासून प्रवेश अर्जाचा भाग एक भरण्यास सुरुवात होणार होती. मात्र त्यात आता बदल करण्यात आला आहे.

पुणे, पिंपरी चिंचवड, मुंबई महानगर क्षेत्र, नाशिक, अमरावती आणि नागपूर या महापालिका क्षेत्रातील उच्च माध्यमिक शाळा-कनिष्ठ महाविद्यालये वगळता उर्वरित भागातील अकरावीची प्रवेश प्रचलित पद्धतीनेच राबवली जाईल.

सुधारित वेळापत्रकानुसार ३० मेपासून ऑनलाइन नोंदणी आणि प्रवेश अर्जाचा भाग एक भरणे, अर्ज प्रमाणित करून घेता येईल. ३० मे ते राज्य मंडळाने दहावीचा निकाल जाहीर करेपर्यंत उच्च माध्यमिक शाळा-कनिष्ठ महाविद्यालयांना नोंदणी आणि दुरुस्ती करता येईल, शिक्षण उपसंचालकांना उच्च माध्यमिक शाळा-कनिष्ठ महाविद्यालयांनी भरलेली माहिती प्रमाणित करता येईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाचा भाग दोन भरून उच्च माध्यमिक शाळा-कनिष्ठ महाविद्यालयांचे पसंतीक्रम नोंदवता येईल. त्यासाठीच्या तारखा स्वतंत्रपणे जाहीर केल्या जातील असे नमूद करण्यात आले आहे. अधिक माहिती https://11thadmission.org.in या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.