scorecardresearch

पुरवणी परीक्षेतील विद्यार्थ्यांचे अकरावीला प्रवेश घेण्यासाठी हाल

महाविद्यालयांमधील रिक्त जागांचा घोडेबाजार सुरू असल्यामुळे पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे सर्वाधिक हाल होत आहेत.

अकरावीची प्रवेश प्रक्रिया महाविद्यालयांवर सोपवून शिक्षण विभागाने हात झटकल्यानंतर आता महाविद्यालयांमध्ये पुन्हा प्रवेशाचा गोंधळ सुरू झाला आहे. शहरातील सर्व महाविद्यालयांमधील रिक्त जागांची नेमकी माहितीही शिक्षण विभागाने अद्याप उपलब्ध करून दिलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्येक महाविद्यालयामध्ये खेटे घालावे लागत आहेत. महाविद्यालयांमधील रिक्त जागांचा घोडेबाजार सुरू असल्यामुळे पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे सर्वाधिक हाल होत आहेत.
अकरावीच्या विद्यार्थ्यांचे राहिलेले प्रवेश, महाविद्यालय बदलून घेण्यासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश आणि पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश महाविद्यालयाच्या स्तरावर करण्याच्या सूचना विभागीय शिक्षण उपसंचलकांनी दिल्या होत्या. शिक्षण विभागाने प्रवेश प्रक्रियेची घेतलेली जबाबदारी झटकून टाकल्यानंतर महाविद्यालयांमध्ये मात्र गोंधळ सुरू झाला आहे. महाविद्यालयांच्या आवारात प्रवेश करून देणाऱ्या संघटनांच्या प्रतिनिधींच्या फे ऱ्या सुरू झाल्यामुळे प्राचार्य तणावात आहेत. या सगळ्या प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांचे मात्र हाल होत आहेत. मुळातच नियमित प्रवेश प्रक्रिया संपताना विशिष्ट महाविद्यालयच हवे म्हणून हटून बसलेल्या, महाविद्यालय बदलून हव्या असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रियेच्या फे ऱ्या वाढवल्या गेल्या. बहुतेक महाविद्यालयांमध्ये रिक्त जागांवर या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. त्यामुळे पुरवणी परीक्षेतील मुलांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पुरवणी परीक्षेत गुण वाढलेल्या, चांगले गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
नियमित विद्यार्थ्यांना पाच फे ऱ्यांची संधी देऊनही विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला नाही. त्या विद्यार्थ्यांसाठी अनेक फे ऱ्या घेऊन प्रवेश समितीने प्रवेश प्रक्रिया लांबवली. त्यानंतर पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवून देण्याची जबाबदारी शिक्षण विभागाने झटकून टाकली. त्यातच किती महाविद्यालयांमध्ये नेमक्या किती जागा रिक्त आहेत, याचीही एकत्रित माहिती शिक्षण विभागाने जाहीर केलेली नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना आता प्रत्येक महाविद्यालयांत खेटे घालावे लागत आहेत. काही महाविद्यालयांनी आपल्याकडील रिक्त जागांचा तपशील संकेतस्थळावर जाहीर केला आहे. पण मुळातच समुपदेशन फेरीतच गोंधळ झाल्यामुळे महाविद्यालयांनी जाहीर केलेल्या तपशिलांची खातरजमा करणेही शिक्षण विभागाला अवघड झाले आहे. अनेक महाविद्यालयांची संकेतस्थळे अद्ययावत नाहीत. सध्या पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील साधारण २ हजार विद्यार्थ्यांना प्रवेशाची चिंता सतावत आहे.
प्राचार्य चिंतेत
प्रवेश मिळण्यासाठी प्राचार्यावर संघटना आणि दलालांकडून दबाव आणला जातो. त्या पाश्र्वभूमीवर अनेक मोठय़ा महाविद्यालयांनी त्यांच्या व्यवस्थापन कोटय़ातील राखीव जागाही केंद्रीय प्रवेश समितीला देऊन टाकल्या होत्या. मात्र, आता शेवटच्या टप्प्यावर सगळी जबाबदारी प्राचार्यावर आल्यामुळे प्राचार्य मात्र तणावात आहेत.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 11th std admission in mesh