यंदाच्या सार्वजनिक गणेशोत्सावाच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिका आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांच्यात श्रेयवादाची लढाई सुरु आहे. सार्वजनिक गणेशोत्सवाचा वाद मिटून यासंदर्भातील सत्य समोर यायला हवे, अशी भूमिका खासदार संभाजीराजे यांनी पुण्यात मांडली. भाऊसाहेब रंगारी गणेश मंडळातील कार्यकर्त्यांची त्यांनी बुधवारी भेट घेतली. खरा इतिहास सर्वांसमोर यायला हवा, असे ते म्हणाले. या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले. एवढेच नाही तर भाऊसाहेब रंगारी यांची सरकारने दखल घ्यायला हवी, असेही ते म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भाऊसाहेब रंगारी यांनी १८९२ मध्ये गणेशोत्सवाला सुरूवात केल्याची शासकीय पुस्तकात नोंद आहे. हा खरा इतिहास सर्वांसमोर यायला हवा. याबाबतचे मंडळाकडे शासकीय पुरावे देखील आहेत. या सर्व विषयावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे संभाजीराजे यांनी सांगितले. सार्वजनिक गणेशोत्सव कोणत्या वर्षी सुरु झाला, यावरून पुणे शहरात वाद सुरु आहेत. पुणे महापालिका आणि राज्य सरकारकडून यंदा गणेशोत्सवाचे १२५ वे वर्ष साजरे करण्यात येते आहे. पालिका आणि सरकारच्या या भूमिकेवर श्रीमंत भाऊसाहेब रंगारी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने आक्षेप घेतला होता. सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात भाऊसाहेब रंगारी यांनी केली असून, सार्वजनिक गणेश उत्सवाचे यंदा १२६ वे वर्ष म्हणून साजरे करा, अशी मागणीसाठी भाऊसाहेब रंगारी मंडळाने न्यायालयात याचिका दाखल केली आहे. न्याय मिळावा यासाठी कार्यकर्ते चक्री उपोषणास देखील बसले आहेत. संभाजीराजे यांनी मंडळाच्या कार्यकर्त्याची भेट घेतल्यानंतर सरकार काय भूमिका घेते याकडे लक्ष लागले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 125th year of ganeshutsav controversy sambhaji raje statement in pune
First published on: 23-08-2017 at 20:18 IST