पिंपरी : पिंपरीत अनुदानित शाळेतील १३ विद्यार्थ्यांना संकलित शुल्क भरले नाही, म्हणून वर्गात उभे केले. त्याचे छायाचित्र पालकांच्या समाजमाध्यमातील व्हॉट्सअप ग्रुपवर टाकले. यामुळे विद्यार्थ्यांचा अपमान झाल्याचा आरोप ‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया’ पक्षाने केला.
अनुदानित शाळेला नियमानुसार विद्यार्थ्यांकडून वाढीव शुल्क घेतले जात नाही. संकलित शुल्काच्या नावाने शाळा प्रशासन पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांकडून पाच हजार ५० रुपये, तर नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांकडून सहा हजार ५० रुपये शुल्क आकारते. हे शुल्क भरले नाही म्हणून वर्गशिक्षिकेने सात मुले आणि सहा मुलींना वर्गात उभे करून त्यांचे छायाचित्र काढले. हे छायाचित्र पालकांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर टाकले. यामुळे विद्यार्थी आणि पालक दोघांचाही अपमान झाल्याची तक्रार ‘रिपाइं’च्या पदाधिकाऱ्यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागाकडे केली.
तक्रार येताच शिक्षण विभागाचे सहायक प्रकल्प अधिकारी विलास पाटील यांची तपास अधिकारी म्हणून नेमणूक केली. त्यांनी मंगळवारी शाळेत जाऊन वर्ग शिक्षिका, पालक आणि विद्यार्थ्यांची चौकशी केली. पाटील म्हणाले, प्राथमिक चौकशीत शाळेच्या महिला वर्ग शिक्षिकेने इयत्ता सातवी वर्गातील १३ विद्यार्थ्यांना वर्गात उभे केले होते. त्याचे छायाचित्र पालकांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकले. मात्र, त्यांनी तो त्वरित हटविला (डिलीट) केला. यापुढील चौकशीसाठी समिती नेमण्याची शिफारस केली आहे.
दरम्यान, ‘झालेला प्रकार चुकीचा असून या प्रकाराची संस्थेच्या वतीने चौकशी करण्यात येईल. चौकशीत दोषी आढळणाऱ्यावर नियमानुसार कारवाई केली जाईल,’ अशी प्रतिक्रिया शाळा समितीच्या अध्यक्षांनी दिली.
शाळेतील मुख्याध्यापक, वर्गशिक्षिका आणि पालकांची चौकशी करण्यासाठी समिती नेमली जाईल. या समितीचा अहवाल शिक्षण उपसंचालकांना सादर केला जाईल, असे महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी- संगीता बांगर यांनी सांगितले.