नवी दिल्ली येथे होणाऱ्या ‘वुडपेकर चित्रपट महोत्सवा’मध्ये (डब्ल्यूएफएफ) महाराष्ट्रातील १४ लघुपट दाखविले जाणार आहेत. त्यापैकी ४ लघुपट पुण्यातील आहेत. सीएमएसआर फाउंडेशनतर्फे आयोजित करण्यात आलेला हा महोत्सव १९ ते २१ डिसेंबर या कालावधीत इंडिया हॅबिटॅट सेंटर येथे होणार आहे.
चित्रपट महोत्सवामध्ये देशातील विविध राज्यांमधील एकूण ४५ चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. पर्यावरण, धर्म आणि संस्कृती, मुले, आरोग्य, जीवनमान यांसारख्या निरनिराळ्या विषयांवरील चित्रपट या वेळी सादर होतील. महाराष्ट्रामधून मुंबईतील ‘जलदिंडी’, ‘शेअर केअर जॉय’, ‘भारतमाता की जय’, ‘भारतमाता’, ‘दाने दाने पे’, ‘ब्रेकिंग मुंबई’, ‘बदलते नक्षे’, ‘टेक बॅक द फाइट’ हे लघुपट, पुण्यातील ‘ज्योतिर्गमय’, ‘दाव’, ‘सिकींग ए स्पेस कॉल्ड पिस’ आणि ‘लीला’, ठाण्यातील ‘वेगे वेगे धाऊ’ आणि अहमदनगर येथील ‘भेका’ हे चित्रपट दाखविले जाणार आहेत.
‘पहिल्याच महोत्सवामध्ये १२ हून अधिक राज्यांतील मिळणाऱ्या प्रतिसादामुळे लघुपट, माहितीपट आणि चित्रपट महोत्सवांची लोकप्रियता वाढत असल्याचे दिसून येते,’ असे मत महोत्सवाचे जनसंपर्क संचालक नरेंद्र यादव यांनी व्यक्त केले. महोत्सवामध्ये महाराष्ट्र, दिल्ली, केरळ, पश्चिम बंगाल, तमिळनाडू, गुजरात, ओडिशा, कर्नाटक, हरयाणा, आसाम, आंध्र प्रदेश व उत्तर प्रदेश या राज्यांमधील चित्रपट सादर होणार आहेत.