शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळी प्रकल्पात सुरू असलेला मुसळधार पाऊस शनिवारी सकाळपर्यंत कायम होता. त्यामुळे खडकवासला, पानशेत पाठोपाठ वरसगाव धरणही शनिवारी १०० टक्के भरले आहे. वरसगाव आणि पानशेत धरणातून विसर्ग सुरू असल्याने खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग १८ हजार ४९१ क्युसेकपर्यंत वाढवण्यात आला आहे.

सध्या चारही धरणांमधील पाणीसाठा ९७ टक्क्यांवर पोहोचला आहे. शुक्रवारी रात्रीपासून शनिवारी सकाळपर्यंत टेमघर धरण क्षेत्रात ९५ मिलिमीटर, वरसगाव धरण परिसरात ५३ मि.मी, पानशेत धरण परिसरात ५० मि.मी, तर खडकवासला धरण क्षेत्रात पाच मि.मी. पाऊस पडला. खडकवासला धरणातून मुठा नदीत रात्री दहा वाजल्यापासून ९४१६ क्युसेकने पाणी सोडण्यात आले. मात्र, शनिवारी सकाळी वरसगाव धरण पूर्ण क्षमतेने भरले. त्यामुळे वरसगाव, पानशेत या धरणातून खडकवासला धरणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. परिणामी खडकवासला धरणातून मुठा नदीत सकाळी आठ वाजता १३ हजार ९८१ क्युसेक, दहा वाजता १८ हजार ४९१ क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे, असे खडकवासला धरण साखळी प्रकल्पाचे सहायक अभियंता यो.स.भंडलकर यांनी सांगितले.

प्रमुख धरणांमधील पाणीसाठा टीएमसी, टक्क्यांत
टेमघर                   ३.१७      ८५.४८
वरसगाव               १२.७९    ९९.७७
पानशेत                 १०.५७     ९९.२७
खडकवासला        १.९७      १००
एकूण                   २८.५०    ९७.७९