पुणे : शहर परिसरात गेल्या सुमारे २० दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे १९३ झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. दर वर्षी पावसाळ्यात झाडे कोसळण्याच्या घटना घडतात. मात्र, या वर्षी आधीच पाऊस सुरू झाल्याने झाडे कोसळण्याच्या मे महिन्यातील सर्वाधिक घटना यंदा घडल्या.

‘मान्सूनपूर्व पावसात सोसाट्याच्या वाऱ्यामुळे झाडे कोसळण्याच्या घटना घडतात. यंदा मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातच शहर, परिसरात वळवाचा पाऊस सुरू झाला. शहरातील वेगवेगळ्या भागांत कमी-अधिक प्रमाणात पाऊस झाला. आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार सोमवारपर्यंत (२६ मे) शहराच्या वेगवेगळ्या भागांत १९३ ठिकाणी झाडे कोसळली,’ अशी माहिती अग्निशमन दलाचे सहायक विभागीय अधिकारी विजय भिलारे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.

‘झाडे कोसळण्याच्या घटना घडल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन तातडीने मदतकार्य केले. झाडांच्या फांद्या हटवून रस्ते वाहतुकीस खुले करून दिले. झाडे कोसळण्याच्या घटनांची माहिती महापालिकेच्या उद्यान विभागाला कळविण्यात येते. त्यानंतर उद्यान विभागाकडून पुढील कार्यवाही करण्यात येते,’ असेही त्यांनी नमूद केले.

झाडे कोसळण्याच्या घटना

जानेवारी : २५

फेब्रुवारी : २९

मार्च : ३९

एप्रिल : ७२

मे : १९३

आपत्कालीन परिस्थितीसाठी सज्ज’

‘अग्निशमन दलाकडून महापालिका, पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण, तसेच राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकासह विविध यंत्रणांशी समन्वय साधण्यात आला आहे. पावसाळ्यात वसाहतींमध्ये पाणी शिरणे, झाडे कोसळणे, सीमाभिंत कोसळणे, जुन्या वाड्यांचा भाग कोसळणे अशा प्रकारच्या घटना घडतात. पाणी शिरणे, तसेच पूरस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांची सुटका करण्यासाठी अग्निशमन दलाकडे बोटी आहेत. आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान सज्ज असून, विविध प्रकारची उपकरणे अग्निशमन दलाच्या वाहनात उपलब्ध आहेत,’ असे विजय भिलारे यांनी सांगितले.

झाडे कोसळण्याची कारणे काय?

– परदेशी शोभिवंत झाडांची मुळे कमकुवत होणे.

– रस्ते खोदाईमुळे झाडांची मुळे सैल होणे.

– नवीन बांधकामाचा पाया खोदताना, मुळे सैल होणे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

– झाडांच्या मुळाभोवती केलेल्या सिमेंटच्या पारांमुळे मुळांना धक्का बसणे.