बेशिस्त वर्तनाबद्दल झारखंडचे पवन खालको व गुंजनकुमारी या तिरंदाजांना आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिटय़ूटमधून (एएसआय)डच्चू देण्यात आला आहे. लैगिंक चाळे करताना हे दोन खेळाडू आढळल्यानंतर त्यांची हकालपट्टी करण्यात आल्याचे संस्थेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.
या दोन खेळाडूंचे संबंध असल्याचे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना माहित झाले होते. हे दोन्ही खेळाडू खेळाडूंच्या वसतिगृहात लैंगिक चाळे करीत असल्याचे आढळून आले. त्यांनी संस्थेच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. भारतीय तिरंदाजी महासंघाचे साहाय्यक सचिव गुंजन अबरोल यांनी या वृत्तास दुजोरा देत सांगितले,की या दोन्ही खेळाडूंना ‘कारणे दाखवा’ नोटीस दिली असून सात दिवसांत खुलासा करण्याचा अवधी देण्यात आला आहे. या दोन्ही खेळाडूंना लैंगिक चाळे करताना अन्य खेळाडूंनी पाहिले असल्यामुळे या खेळाडूंची चौकशी न करता त्यांना यापुढे स्पर्धामध्ये भाग घेण्यास मनाई करण्यात येणार आहे.
आगामी जागतिक स्पर्धेसाठी हे दोन्ही खेळाडू राष्ट्रीय सराव शिबिरात येथे प्रशिक्षण घेत होते.
या संस्थेत एक महिन्यापूर्वी आसामच्या प्रतिमा बोरो या तिरंदाजाने आत्महत्या केली होती.