बारामती : मोटार चालकाचे नियंत्रण सुटल्याने मोटार आणि दुचाकीमध्ये झालेल्या आपघातात मोटारचालक आणि दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. जगदगुरू श्री संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावरील उंडवडी सुपे (ता. बारामती) येथील शिर्सुफळ फाट्यावर गुरुवारी रात्री साडे दहाच्या सुमारास ही घटना घडली.
मोटार चालक अमित लक्ष्मण लगड (वय ३९ रा. गोपाळवाडी, भोईटेनगर, ता. दौंड) आणि दुचाकीस्वार विशाल रामचंद्र कोकरे (वय ३४, रा. धुमाळवाडी, पणदरे, ता. बारामती) असे मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोटार दौंडकडून भरधाव वेगाने बारामतीकडे निघाली होती. मोटार चालक लगड यांचा मोटारीवरील ताबा सुटल्याने मोटार दुभाजक ओलांडून दुसऱ्या बाजूने जात असलेल्या दुचाकीला धडकली. त्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला. सुपे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसरे तपास करत आहेत.