लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी : जुन्या पुणे-मुंबई महामार्गासह शहरातील पाच रस्त्यांवर महापालिका अर्बन स्ट्रीट अंतर्गत सहा ते आठ फुटांचे पदपथ विकसित करणार आहे. त्यावर दोनशे कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. कोट्यवधी खर्च करुन विकसित केलेल्या पदपथांवर अतिक्रमणाचा विळखा होत असून पादचाऱ्यांना सेवा रस्त्यावरुनच चालावे लागत असल्याचे चित्र आहे.

पिंपरी-चिंचवड शहराच्या लोकसंख्येबरोबरच वाहनांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. वाहनांची संख्या वाढत असताना रस्ते मात्र अरूंद करण्यावर महापालिकेचा भर दिसत आहे. शहरातील सशुल्क वाहनतळही बासनात गुंडाळले आहे. त्यामुळे शहराच्या मुख्य रस्त्यांवर सकाळी, सायंकाळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. आता पुन्हा सहा ते आठ फूट पदपथ विकसित केले जाणार आहेत.

आणखी वाचा-पिंपरी चिंचवड : पवना धरण ओव्हरफ्लो; ३५०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू

पुणे-मुंबई महामार्ग, टेल्को रोड ते बालाजीनगर, पवना ब्रिज ते डांगे चौक, डांगे चौक ते भूमकर चौक आणि शिवार चौक ते गोविंद गार्डन हॉटेल या पाच रस्त्यांवर अर्बन स्ट्रीट अंतर्गत पदपथ विकसित आणि सुशोभीकरण करण्यात येणार आहेत. पुणे-मुंबई महामार्ग बीआरटीमुळे अरुंद झाला आहे. पायी चालणाऱ्यांची संख्या वाहनांच्या तुलनेत अत्यंत नगण्य आहे. रस्ते अर्बन स्ट्रीट नुसार विकसित झाल्यानंतर रस्त्याची रुंदी कमी होणार आहे. त्यामुळे वाहतुकीची समस्या निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पदपथावरील अतिक्रमणाकडे दुर्लक्ष

शहरातील अनेक पदपथावर दुकानदार, विक्रेते, वाहनचालक अतिक्रमण करतात. दुकानदार साहित्य पदपथावर मांडतात. वाहने थेट पदपथावरच पार्क केलेली असतात. या अतिक्रमणाकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांना जीव मुठीत धरुन सेवा रस्त्यावरूनच चालावे लागते.

आणखी वाचा-तृतीयपंथीच्या दहीहंडीला पुणेकर नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद

पदपथ व सायकल मार्गावर झालेला खर्च

दापोडी ते पिंपरी (दोन्ही बाजू)- १०९ कोटी
पिंपरी ते निगडी (एक बाजू)- ६० कोटी
निगडी ते पिंपरी (एक बाजू)- ६० कोटी
टेल्को रोड-लांडेवाडी ते थरमॅक्स चौक – १६० कोटी
बिर्ला रुग्णालय ते डांगे चौक- १९ कोटी
डांगे चौक ते कस्तुरी चौक- १५ कोटी
शिवार चौक ते गोविंद गार्डन चौक- ५५ कोटी
सांगवी ते किवळे- ९० कोटी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अर्बन स्ट्रीट अंतर्गत विकसित करण्यात येणा-या पाच रस्त्यांवर तीन मीटरची एक अशा दोन मार्गिका आहेत. त्यामुळे पदपथ विकसित केल्यास वाहतुकीला अडथळा येणार नाही. अत्याधुनिक पद्धतीचे पदपथ विकसित केले जाणार आहेत. त्यामुळे शहराच्या आणि रस्त्यांच्या सौदर्यांत भर पडणार आहे. -प्रमोद ओंभासे, सह शहर अभियंता, पिंपरी-चिंचवड महापालिका