मेफेड्रोन बाळगणाऱ्या एकास गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने कोंढव्यात पकडले. त्याच्याकडून २० लाख ५२ हजारांचे १७१ मिलीग्रॅम मेफेड्रोन जप्त करण्यात आले.

राहुल हितेश्वर नाथ (वय २४, रा. शिवनेरीनगर, कोंढवा, मूळ रा. गुवाहटी, आसाम) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. अमली पदार्थ विरोधी पथक कोंढवा भागात गस्त घालत होते. त्या वेळी शिवनेरीनगर परिसरात एकजण मेफेड्रोनची (एमडी) विक्री करत असल्याची माहिती पोलीस कर्मचारी अझीम शेख यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून त्याला पकडले. अतिरिक्त आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश खांडेकर, उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण, नितीन जगदाळे, युवराज कांबळे, दिशा खेवलकर आदींनी ही कारवाई केली.

नाथ याच्याकडून दुचाकी, ३१ हजार ५०० रुपये, मोबाइल संच तसेच २० लाख ५२ हजारांचे मेफेड्रोन जप्त करण्यात आले. नाथने मेफेड्रोन कोठून आणले, यादृष्टीने तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.