विद्यार्थिसंख्येअभावी महाविद्यालय चालवणे कठीण होत असल्यामुळे संस्थाचालकांनी अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन अभ्यासक्रमाची महाविद्यालये बंद करण्यास सुरूवात केली आहे. राज्यातील २३ खासगी महाविद्यालये बंद करण्यात आली आहेत, तर पुढील शैक्षणिक वर्षांत (२०१७- १८) ही संख्या अधिक वाढणार आहे. देशातील एकूण १२२ महाविद्यालये बंद झाली आहेत.

गेल्या काही वर्षांपासून देशातील अभियांत्रिकी शिक्षण डबघाईला आले आहे. विद्यार्थ्यांचा प्रतिसाद घटल्यामुळे अभियांत्रिकी महाविद्यालये बंद करण्याकडे संस्थाचालकांचा कल आहे. चालू शैक्षणिक वर्षांत (२०१६-१७) देशातील १२२ महाविद्यालये बंद करण्यात आली आहेत. त्यातील २३ महाविद्यालये ही राज्यातील आहेत. पुणे, नागपूर, कोल्हापूर येथील नावाजलेल्या महाविद्यालयांनी अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन अभ्यासक्रम बंद केले आहेत. त्याचप्रमाणे पुढील शैक्षणिक वर्षांसाठी (२०१७-१८) महाविद्यालये बंद करण्याच्या अर्जावर सध्या अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेकडून कार्यवाही केली जात आहे. विद्यार्थी संख्या घटल्यामुळे महाविद्यालय सुरू ठेवण्याचा खर्च पेलवत नसल्याचे कारण संस्थांकडून देण्यात आले आहे.

महाराष्ट्रानंतर गुजरात (१५), हरयाणा (१३), उत्तरप्रदेश (१२), राजस्थान आणि कर्नाटक (११), तेलंगणा आणि मध्यप्रदेश (७), पंजाब (६), तमिळनाडू आणि केरळ (३), उत्तराखंड, पश्चिमबंगाल, छत्तीसगड आणि हिमाचलप्रदेश (२), आंध्रप्रदेश, झारखंड आणि दिल्ली (१) अशी महाविद्यालये बंद झाली आहेत.

प्रवेश क्षमता घटणार

राज्यातील सामाईक प्रवेश प्रक्रियेत यंदा ३७२ अभियांत्रिकी महाविद्यालये आणि १ लाख ५५ हजार प्रवेश क्षमता होती. व्यवस्थापन अभ्यासक्रमाची ३८८ महाविद्यालये आणि ५२ हजार प्रवेश क्षमता होती. यंदा बंद झालेली महाविद्यालये आणि पुढील शैक्षणिक वर्षांसाठी महाविद्यालय बंद करण्यासाठी आलेले अर्ज यानुसार अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची प्रवेश क्षमता साधारण २ हजारांनी, तर व्यवस्थापन अभ्यासक्रमाची प्रवेश क्षमता ८०० ते १ हजाराने कमी होण्याची शक्यता तंत्रशिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.