पुणे : शहरात २९ ठिकाणी आरोग्यवर्धिनी केंद्र उभारण्यासाठी केंद्र सरकारकडून ६ कोटी ६४ लाखांचा निधी महापालिकेला प्राप्त झाला आहे. महापालिकेला निधी मिळाल्याने आरोग्यवर्धिनी केंद्र स्थापन करण्याच्या प्रक्रियेला गती मिळणार असून येत्या महिन्याभरात या केंद्रांची उभारणी करण्याचे नियोजन महापालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.
शहरातील आरोग्य सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी आणि आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी आरोग्यवर्धिनी केंद्र उभारण्याचे नियोजित आहे. शहराच्या विविध भागांबरोबरच समाविष्ट गावातही आरोग्यवर्धिनी केंद्र उभारण्यात येणार आहेत. एकूण १३० आरोग्य केंद्र उभारण्याचे प्रस्तावित आहे. या आरोग्यवर्धिनी केंद्रात एक डाॅक्टर, दोन परिचारिका, ड्रेसर आणि फार्मासिस्ट असे चारजणांचे पथक कार्यरत राहणार आहे. आरोग्यवर्धिनी उभारण्यासाठी केंद्र सरकारकडून आर्थिक निधी मिळणार आहे. त्यासाठी खासगी कर्मचारी वर्गही नियुक्त करण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात २९ केंद्र सुरू करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. हिंगणे, वारजे-कर्वेनगर, शिवणे, हडपसर-मुंढवा, वानवडी, कोथरूड, बावधन, कोंढवा, धावडे, धनकवडी या भागात केंद्र उभारण्यात येणार असून त्यासाठी जागा निश्चितही करण्यात आली आहे.
हेही वाचा – अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विद्यापीठात ७५ आयुर्वेदिक वनस्पतींचे अमृत उद्यान
हेही वाचा – पुणे : प्रामाणिक मिळकतधारकांची एक कोटीची बक्षीसे कागदावरच
दरम्यान, आरोग्यवर्धिनी केंद्रांबरोबरच दहा रुग्णालयांत पाॅलिक्लिनिक उभारण्यात येणार आहे. त्यामध्ये सर्व आजांरावरील तज्ज्ञ डाॅक्टरांची नियुक्ती करण्यात येणार असून यामध्ये स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ, त्वचारोगतज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ अशी सुविधा असणार आहे. आरोग्यवर्धिनी केंद्र आणि पाॅलिक्लिनिकमुळे आरोग्य सेवेचे बळकटीकरण होईल, असा दावा महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आला आहे.