मोसमी वारे दाखल झाल्यानंतरही पुण्याला हुलकावणी देणारा पाऊस आता चांगलाच स्थिरावला असून, धरणांच्या क्षेत्रातही त्याने दमदार हजेरी लावली आहे. त्याचा परिणाम म्हणून पुण्याला पाणी पुरवणाऱ्या खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या धरणांमध्ये मिळून सुमारे साडेतीन अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा साठा सव्वा ते दीड टीएमसीने अधिक आहे.
पुण्यात ८ जूनच्या आसपास मान्सून दाखल झाला. त्यानंतरही पुण्याच्या परिसरात विशेष पाऊस पडत नव्हता. शनिवारी सायंकाळपासून पावसाला सुरूवात झाली. त्यानंतर गेले दोन दिवस चांगलाच पाऊस पडला. पुण्याच्या धरणांच्या क्षेत्रातही हीच स्थिती आहे. शनिवारी रात्री पडलेल्या दमदार पावसामुळे रविवारी धरणांमध्ये मोठय़ा प्रमाणात पाणी येण्यास सुरूवात झाली. सोमवापर्यंत हे कायम होते. सुरूवातीचा पाऊस चांगला झाल्यामुळे आता पुढे पडणाऱ्या पावसापैकी जास्तीत जास्त पाणी धरणांमध्ये जमा होण्याची शक्यता आहे, असे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले. पुण्यासाठीच्या चारही धरणांमध्ये एकूण ३.४१ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. एकूण साठय़ाच्या तुलनेत तो सुमारे पावणेबारा टक्के आहे. या धरणांमध्ये गेल्या वर्षी २२ जूनपर्यंत केवळ दोन टीएमसी इतकाच पाणीसाठा होता. त्या तुलनेत या वर्षीची स्थिती बरी आहे, असेही या विभागाकडून सांगण्यात आले. पिंपरी-चिंचवड शहराला पाणी पुरवणाऱ्या पवना धरणाच्या क्षेत्रातही गेल्या दोन दिवसांत चांगला पाऊस पडला. तेथील पाणीसाठा २५ टक्क्य़ांपेक्षा जास्त आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

धरणांमधील साठा :
धरणाचे नाव    आजचा साठा (टीएमसी)        टक्केवारी    जूनमघधील पाऊस (मिलिमीटर)
खडकवासला    ०.३५                    १७.८०    २०८
पानशेत        २.३७                    २२.२४    ३१२
वरसगाव        ०.६९                    ४.५७        ३१५
टेमघर        ०                    ०        ३५५
.

‘‘गेल्या दोन दिवसांतील पावसामुळे पुण्यासाठीच्या चारही धरणांमध्ये सुमारे एक टीएमसी इतका पाणीसाठा वाढला आहे. या पावसामुळे पाणी येण्यास सुरूवात झाली. परिणामी धरणांच्या दृष्टीने नवा हंगाम सुरू झाला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील दोन दिवसांतही पाऊस कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढच्या काही दिवसांतही धरणांच्या साठय़ात वाढ होण्याची शक्यता आहे. पुणे शहर दृष्टीने आणि या धरणांवर अवलंबून असलेली इतर गावे तसेच, शेती यांच्या दृष्टीने ही सकारात्मक बाब आहे.’’
अतुल कपोले, अधीक्षक अभियंता (जलसंपदा विभाग, पुणे)

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 3 5 tmc water in pune dams
First published on: 23-06-2015 at 03:30 IST