पुणे : कोथरूड येथील डाव्या आणि उजव्या भुसारी कॉलनीतील सुमारे ३० हजार रहिवासी विस्कळीत वीजपुरवठ्याने त्रस्त आहेत. गेल्या महिन्यापासून दररोज वीजपुरवठा खंडित होत असल्याची तक्रार रहिवाशांनी केली. वीजपुरवठ्यातील व्यत्यय कालावधी कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे ‘महावितरण’कडून स्पष्ट करण्यात आले आहे.

‘गेल्या महिन्यापासून कॉलनीतील वीजपुरवठा सातत्याने खंडित होत आहे. दररोज किमान दहा वेळा तरी वीज जाते. व्यवसाय, नोकरीतून निवृत्त झालेल्यांना घरात वीजच नसल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. वीज बंद असल्याने लिफ्ट बंद, अशा वेळी वयाच्या सत्तरीत इमारतींचे दोन-तीन मजले चढून जावे लागते, टीव्ही बघता येत नाही, लॅपटॉपवर काम करता येत नाही. प्रत्येक वेळी तक्रार करूनही उडवाउडवीची उत्तरे दिली जातात,’ असे ज्येष्ठ नागरिक प्रकाश पुंडे यांनी सांगितले.

‘पूर्वी केवळ गुरुवारी दुरुस्तीसाठी वीज बंद असायची. आता मात्र आठवड्यातून कोणत्याही वारी, दिवसातून कोणत्याही वेळी वीजपुरवठा खंडित होतो. कुटुंबाला या विस्कळीत वीजपुरवठ्याचा त्रास रोज सहन करावा लागत आहे. पहाटे उठल्यानंतर घरात, कॉलनीत वीज नसली की, व्यवस्थित दिसत नाही. त्यामुळे बाहेर पडता येत नाही. वीज नसल्याने फ्रिज बंद होतो, त्यामुळे भाजीपाला, दूध अशा रोजच्या गरजेच्या वस्तू खराब होतात. त्या साठवता येत नाहीत. तात्पुरती दुरुस्ती केली जाते. मात्र, त्यानंतरही विजेचा लपंडाव सुरूच असतो,’ अशी व्यथा जयश्री वानखेडे यांनी मांडली.

राजीव निगडीकर म्हणाले, ‘‘वर्क फ्रॉम होम’मुळे आठवड्यातून काही दिवस घरातून काम करावे लागते. त्या वेळी वीज नसल्याने जास्त त्रास होतो. चार्जिंग होत नसल्यामुळे लॅपटॉप, मोबाइल बंद पडतात. विस्कळीत वीज पुरवठ्याने पाण्याचीही मोठी समस्या निर्माण होते.’ रात्री-अपरात्री, दिवसातून कोणत्याही वेळी वीजपुरवठा खंडित होत असल्याचे रमेश भोज यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अखंडित वीजपुरवठ्यासाठी प्रयत्नवीजपुरवठा खंडित होऊ नये आणि त्यामुळे नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र, अनेकदा नैसर्गिक अडथळ्यांनी, मानवनिर्मित कारणांनीही वीजपुरवठा खंडित होतो. त्या वेळी वीज ग्राहकांनी महावितरणच्या १९१२ या ‘हेल्पलाइन’ क्रमांकावर तक्रार नोंदवावी. त्यानंतर बिघाडाचे कारण शोधून दुरुस्तीची कामे लवकर करता येतात. वीजपुरवठ्याच्या समस्येबाबत कोणत्याही वेळी महावितरणची यंत्रणा उपलब्ध असते, असे महावितरणच्या कोथरूड विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.