पिंपरी : वाकड ते नाशिक फाटा या बीआरटी मार्गावर पिंपळे गुरव येथील कल्पतरू सोसायटी चौकात भुयारी मार्ग (सब वे) बांधण्यात येणार आहे. या कामासाठी सन २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात पाच कोटींची वाढ करण्यात आली आहे. पूर्वी ३० कोटी रक्कम होती. त्यामध्ये वाढ करून ३५ कोटी रुपये करण्यात आली आहे.
नाशिक फाटा चौकातील जेआरडी टाटा दुमजली उड्डाणपुलावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. या पुलावरून वाकडच्या दिशेने मोठ्या प्रमाणात वाहने ये-जा करतात. पिंपळे गुरव, भोसरी पुलावरून वाहतूक आल्यानंतर ती कल्पतरू चौकातील वाहतूक नियंत्रक दिवे (सिग्नल) येथे संथ होते. परिणामी, कोंडीत भर पडते. त्यामुळे हा चौक बंद करण्याच्या हालचाली शहरी दळणवळण विभागाकडून करण्यात आल्या. मात्र, विरोध झाला. आता येथे भुयारी मार्ग बांधण्यात येणार आहे. त्यासाठी अर्थसंकल्पात ३० कोटी रकमेची तरतूद केली होती. त्यात वाढ करून ती ३५ कोटी रुपये करण्यात आली. अर्बन ट्रान्सपोर्ट फंड आणि विशेष योजनेच्या लेखाशीर्षात या रकमेची तरतूद करण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली.
पिंपळे सौदागर येथील पीके चौक वाहतूक नियंत्रक दिवेमुक्त करण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहेत. त्यासाठी ३०ऐवजी ४५ कोटी रकमेचा खर्च केला जाणार आहे.
थेरगाव येथील डांगे चौकातील समतल विलगकाची थेरगाव फाट्याकडील लांबी वाढविण्यात येणार आहे. त्यासाठी २८ऐवजी ५० कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. फुगेवाडीतील हिंदू स्मशानभूमी आणि मुस्लिम दफनभूमीकडे जाण्यासाठी रेल्वे लाइन व नियोजित ३० मीटर एसीएमटीआर मार्गाच्या खालून भुयारी मार्ग बांधण्यात येणार आहे. या कामासाठी रेल्वे विभागाचे शुल्क भरावे लागणार आहे. त्यासाठी २० कोटी रुपये खर्चात वाढ करून ती ३० कोटी करण्यात आली आहे. चिंचवड येथील एम्पायर एस्टेट उड्डाणपुलाजवळ ‘आयटूआर’ अंतर्गत ताब्यात आलेल्या जागेवर आयटीआयसाठी इमारत बांधण्यात येणार आहे. त्यासाठी विशेष योजनेतून शंभर कोटी रकमेची तरतूद करण्यात आली होती. ती वाढवून १२० कोटी करण्यात आली.
दापोडी-निगडी मार्गावर भुयारी मार्ग
पिंपरी येथील मिलिटरी डेअरी फार्म येथे बांधण्यात येत असलेल्या उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात आहे. पुलावरून पिंपरीगाव, पिंपरी कॅम्प, पिंपळे सौदागरकडे ये-जा करणे सुलभ होणार आहे. परिणामी, पुलावरून वाहतूक वाढणार आहे. पुलावरून आलेल्या वाहनांना दापोडी ते निगडी मार्गावर जाता यावे यासाठी या मार्गावर हलक्या वाहनांकरिता भुयारी मार्ग बांधण्यात येणार आहे. त्यामुळे दापोडी ते निगडी मार्गावरून डेअरी फार्म पुलावर जाणे सुलभ होणार आहे.