पुणे : ‘डिग्री हाथ में आनेसे पहेले आप के हाथ में जॉब होगी’ हे ‘थ्री इडियट्स’मधील विरू सहस्त्रबुद्धेचे वाक्य महाविद्यालय परिसरातील मुलाखतींमधून मिळणाऱ्या नोकऱ्यांचे महत्त्व पटवून देणारे आहे. या ‘कॅम्पस प्लेसमेंट’ची आयआयटींमध्ये मोठी चर्चा असते. मात्र यावेळी मुंबई विद्यापीठामध्ये नोंदणी केलेल्यांपैकी ३६ टक्के विद्यार्थ्यांना अद्याप एकाही कंपनीची ‘ऑफर’ आली नसल्याची माहिती आहे.

आयआयटी मुंबईमध्ये डिसेंबरमध्ये भरतीचा पहिला टप्पा पार पडला असून जानेवारीपासून दुसरा टप्पा सुरू झाला आहे. मात्र माजी विद्यार्थी आणि ‘ग्लोबल आयआयटी अल्युम्नी सपोर्ट ग्रुप’चे प्रमुख धीरज सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंतच्या दोन हजार विद्यार्थ्यांनी भरतीसाठी नोंदणी केली असून ७१२ विद्यार्थ्यांना (३६ टक्के) अद्याप नोकरी मिळू शकलेली नाही. भरतीचा दुसरा टप्पा मेअखेर संपुष्टात येईल. गतवर्षीच्या तुलनेत नोकरी न मिळालेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाण ३ टक्क्यांनी वाढले आहे. नोकऱ्यांची निर्मिती न होण्याचा सरकारने गांभीर्याने विचार केला पाहिजे, अशी अपेक्षा धीरज सिंग व्यक्त केली.

हेही वाचा >>>केंद्राचा ‘हा’ निर्णय गहू उत्पादक शेतकऱ्यांच्या मुळावर?

दरम्यान, प्लेसमेंट कमी झाल्या असे म्हणणे तथ्यहीन असल्याचा दावा आयआयटी मुंबई प्रशासनाकडून करण्यात आला आहे. यंदाची प्रक्रिया अद्याप सुरू असून, पुढील तीन महिन्यांत आणखी विद्यार्थ्यांना संधी मिळेल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

आयआयटीची ‘कॅम्पस प्लेसमेंट’ एरवी भरगच्च पगाराच्या नोकऱ्यांसाठी चर्चेत असते. यावेळी मात्र एकतृतीयांश विद्यार्थ्यांना अद्याप नोकरी मिळालेली नाही.

भरतीची आकडेवारी आयआयटी-मुंबईचीच आहे. त्यांनी ‘एनआयआरएफ’सारख्या संकेतस्थळांवर ती दिलेली आहे. देशांतर्गत अर्थव्यवस्था मंदावली आहे, नोकऱ्यांची निर्मिती होत नाही, याचे हे प्रतिबिंब आहे. त्याशिवाय जागतिक मंदीचाही प्रभाव आहे. नोकरी न मिळण्याचा विद्यार्थ्यांना मानसिक ताण येतो. त्यामुळे याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे.– धीरज सिंग, माजी विद्यार्थी