पिंपरी : महापालिकेने ५० हजारांपुढील थकबाकीदारांच्या औद्याेगिक, निवासी, बिगर निवासी, मिश्र, माेकळ्या जमीन अशा ४३८ मालमत्तांच्या लिलावाची प्रक्रिया सुरू केली आहे.  या मालमत्ताधारकांकडे १७ काेटी ३८ लाख ९४ हजार रूपयांची थकबाकी आहे.

कर संकलन विभागाने  थकबाकीदारांच्या मालमत्ता लाखबंद करून जप्त केल्या आहेत. त्यानंतरही मालमत्ताधारकांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने महापालिकेने मालमत्तांचा लिलाव जाहीर केला आहे. एकूण ४३८ मालमत्तांची यादी कर संकलन विभागाने प्रसिद्ध केली आहे. त्यात बिगर निवासी ३००, निवासी ७६, मिश्र ४६, औद्याेगिक १३, तीन माेकळ्या जमिनी अशा मालमत्ता आहेत. या मालमत्ताधारकांकडे ५० हजार ते ६३ लाखांपर्यंतची थकबाकी आहे. त्यात नामाकिंत बांधकाम व्यावसायिक, संस्था, व्यक्ती यांच्या शहराच्या विविध भागातील मालमत्ता आहेत.

या मालमत्ताधारकांना कर भरण्याची शेवटची मुदत २५ फेब्रुवारी देण्यात आली आहे. त्यानंतर लिलाव प्रक्रियेला सुरूवात करण्यात येणार आहे. त्यामुळे थकबाकीदारांनी २५ फेब्रुवारीपर्यंत कर भरून मालमत्तेचा लिलाव टाळावा, असे आवाहन कर आकारणी व कर संकलन विभागाचे सहायक आयुक्त अविनाश शिंदे यांनी केले आहे. 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सलग तीन वर्षे नियमित कर भरल्यास चौथ्या वर्षीच्या करामध्ये मिळणार सवलत

सलग तीन वर्षे नियमितपणे कर भरणाऱ्या मालमत्ताधारकांना चौथ्या वर्षीच्या मालमत्ताकरामध्ये सवलतीव्यतिरिक्त अधिकच्या दोन टक्क्यांची प्रोत्साहनपर सवलत देण्यात येत आहे. त्यामुळे नियमित कराचा भरणा करणाऱ्या मालमत्ताधारकांनी चालू वर्षी अद्यापही कराचा भरणा केला नसेल तर अशा मालमत्ताधारकांना सलग तीन वर्षे नियमित कर भरल्यानंतर चौथ्या वर्षीच्या मालमत्ताकरावर देण्यात येणारी दोन टक्क्यांची सवलत मिळणार नाही. त्यामुळे जे मालमत्ताधारक आपल्या कराचा नियमितपणे भरणा करतात अशा मालमत्ताधारकांनी कर भरण्यामध्ये खंड न पाडता आपल्या थकीत कराचा भरणा केला तर ते दोन टक्क्यांच्या सवलतीचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरणार आहेत.