पिंपरी: जेसीबीच्या सहाय्याने बेकायदेशीर वृक्षतोड केल्याप्रकरणी आकुर्डीतील मे. फॉरमायका कंपनीला पिंपरी पालिकेने ४५ लाख रूपयांचा दंड ठोठावला आहे. कंपनीचा खुलासा प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, असे पालिकेने स्पष्ट केले आहे.

पालिकेच्या उद्यान विभागाचे उप आयुक्त सुभाष इंगळे यांनी ही माहिती पत्रकारांना दिली. कंपनीने बेकायदेशीर वृक्षतोड केली आहे. माहितीच्या अधिकारात ही बाब उघड झाली. वेगवेगळ्या प्रजातींचे ९० वृक्ष जेसीबीच्या सहाय्याने काढण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे प्रत्येक वृक्षामागे ५० हजार रूपये दंड याप्रमाणे कंपनीकडून एकूण ४५ लाख रूपये दंड आकारण्यात येणार आहे. याबाबत कंपनीला नोटीस बजावण्यात आली असून खुलासा मागवण्यात आला आहे. तो प्राप्त झाल्यानंतर झाडांचे संरक्षण व जतन अधिनियमानुसार पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे इंगळे यांनी सांगितले. यासंदर्भात कंपनीकडून अद्याप कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.