पुणे : ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘जय भवानी जय शिवाजी’चा जयघोष, रणशिंगांची ललकारी, मर्दानी खेळाची चित्तथरारक प्रात्यक्षिके आणि ढोल-ताशांच्या गजरात एसएसपीएमएस संस्थेच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचा परिसर शुक्रवारी दुमदुमला. शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने सार्वजनिक शिवस्वराज्य दिन सोहळ्यानिमित्त भगव्या स्वराज्यध्वजासह ५१ फूट शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारण्यात आली.

रिंकल अमित गायकवाड, ललिता रवींद्र कंक, अश्विनी शंकर कडू, वृषाली सुनील जगताप, शोभा भोई, दीपाली विशाल गव्हाणे, ज्योत्स्ना नीलेश जगताप, अश्विनी दरेकर आणि शिवांश सुभाष जागडे यांच्या हस्ते विधिवत पूजन करून स्वराज्यगुढी उभारण्यात आली. शिवकालीन सरदारांचे वंशज, सार्वजनिक शिवस्वराज्य दिनाचे प्रवर्तक समितीचे अध्यक्ष अमित गायकवाड, सचिन पायगुडे, रवींद्र कंक, शंकर कडू, नाना निवंगुणे, प्रवीण गायकवाड, सुनील जगताप, विवेक तुपे, अजित शिंदे, मोहन पासलकर या वेळी उपस्थित होते. पहिल्याच प्रयत्नात बावीसाव्या वर्षी यूपीएससी स्पर्धा परीक्षेत देशात २६ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेले शिवांश सुभाष जागडे यांचा शिवरायांचा जिरेटोप देऊन सन्मान करण्यात आला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डेक्कन जिमखाना येथील छत्रपती संभाजी महाराज स्मारक, चंद्रमौलेश्वर मंदिर यांसह अनेक ठिकाणी स्वराज्य गुढी उभारली जाते. शिवकालीन सरदारांच्या वंशजांकडून ३५१ गडांवर, तसेच श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, तुळशीबाग मंडळ, सेवा मित्र मंडळ, साईनाथ मंडळ, लक्ष्मीबाई दत्त मंदिर यांसह ३६० गणेशोत्सव मंडळांकडून स्वराज्यगुढी उभारून सार्वजनिक शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात आला.