पुणे : मुंबा फिल्म फाऊंडेशनतर्फे २४ ते २८ सप्टेंबर या कालावधीत पुण्यात सहाव्या ‘मुंबा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे’ चे आयोजन करण्यात आले आहे. देशभरातील १०५ चित्रपट मोफत दाखविण्यात येणार असल्याची माहिती महोत्सवाचे आयोजक जय भोसले यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. महोत्सव संयोजक वीरेंद्र चित्राव, संचालक अभिषेक अवचार, सचिव विश्वास शेंबेकर, मराठवाडा कॉलेजचे प्रतिनिधी संतोष शेणई, नूतन कुलकर्णी उपस्थित होते. यावेळी फेस्टिव्हलच्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले.
केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालय, राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी) यांचा सहभाग असलेल्या महोत्सवाचे २४ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (लाॅ काॅलेज रस्ता) येथे ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. तर २८ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता या महोत्सवाचा समारोप आणि पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. यावेळी लघु चित्रपट निर्माते, तीन मास्टर क्लासेस आधारित दिग्दर्शक आणि निर्मात्यांचा ‘खुला संवाद’ आणि चर्चासत्रेही होणार आहेत. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय, पंडित नेहरू नाट्यगृह आणि मराठवाडा मित्र मंडळाचे कॉमर्स कॉलेज या तीन ठिकाणी चित्रपटांचे प्रदर्शन होणार असल्याचे, संयोजक चित्राव यांनी सांगितले.
भारताच्या चित्रपट इतिहासातील दुर्मीळ चित्रपट, लघू चित्रपट, माहितीपट आणि चित्रपट-संबंधित सामग्रीचे संरक्षण करणे, चित्रपटांच्या नुकसानीला आळा घालणे आणि भविष्यातील पिढ्यांसाठी हा वारसा जपणे हा प्रमुख उद्देश असल्याचे यावेळी चित्राव यांच्याकडून नमूद करण्यात आले. त्याचबरोबर चित्रपटप्रेमी, विद्यार्थी आणि व्यावसायिकांना प्रशिक्षण देऊन चित्रपट संरक्षणाची कला शिकवून उत्तम निर्माते निर्माण करण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन केले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कोणकोणत्या चित्रपटांची निवड ?
महोत्सवासाठी देशभरासह अमेरिका, फ्रान्स, जपान, दक्षिण कोरिया, चीन, इटली, जर्मनी, युनायटेड किंग्डम, ब्राझील, स्पेन, रशिया, कॅनडा, अर्जेंटिना, इराण, तुर्की, थायलंड, इस्रायल, ऑस्ट्रेलिया आणि इंडोनेशिया अशा ३३ देशांमधून १ हजार ४२८ चित्रपट प्राप्त झाले होते. त्यापैकी १०५ उत्कृष्ट चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. आहे. यात २५ फीचर फिल्म्स, ७५ पेक्षा जास्त लघू चित्रपट, माहितीपट आणि ‘ॲनिमेशन फिल्म्स’चा समावेश असणार आहे.