मित्राच्या मदतीने केला हत्येचा प्लॅन…!
उसने घेतलेले ३० लाख रुपये परत मागितल्याच्या रागातून ७० वर्षीय व्यक्तीची हत्या करून मृतदेह पुण्याच्या ताम्हिणी घाटात टाकल्याची घटना उजेडात आली आहे. याप्रकरणी चिंचवड पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. रणजित मेला सिंग वय- ७० असं हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी हत्येचा मास्टरमाइंड नारायण इंगळे, राजेश नारायण पवार आणि समाधान ज्ञानोबा मस्के अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
हेही वाचा >>> सावधान! फॉलकोडिनयुक्त औषधे धोकादायक; नशेसाठीही होतोय वापर
आरोपी नारायण इंगळे हा पंजाब सिंध बँकेत मॅनेजर होता. त्या पदावरून काही दिवसांपूर्वी निवृत्त झालेला आहे. त्याने रणजित मेला सिंग यांच्याकडून तीस लाख रुपये उसने घेतले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नारायण इंगळे यांने रणजित मेला सिंग यांच्याकडून तीस लाख रुपये उसने घेतले होते. रणजित मेला सिंह हे नारायण याच्याकडे पैसे परत मागत होते. ते पैसे मिळावेत म्हणून नेहमी तगादा लावायचे. परंतु, नारायण इंगळे याला हे पैसे परत द्यायचे नव्हते. म्हणून, त्याने आरोपी मित्र राजेश नारायण पवार आणि समाधान ज्ञानोबा मस्के यांना रणजीत यांची हत्या करण्यासाठी चार लाख रुपयांची सुपारी दिली.
हेही वाचा >>> पुणे मेट्रो सुसाट…मेट्रोच्या विस्तारित मार्गांना मोदी दाखविणार झेंडा?
दिनांक १९ एप्रिल रोजी मेला सिंग यांना पैसे परत देतो असे म्हणून नारायण इंगळे याने चिंचवडच्या राहत्या घरी बोलावले. तिथं, रणजित मेला सिंग यांचा गळा दोरीने आवळून आणि चाकूने भोकसून हत्या केली. त्यांच्याच गाडीत मृतदेह टाकून ताम्हिणी घाटात नेऊन मृतदेहाची विल्हेवाट लावली. याप्रकरणी रणजीत मेला सिंग बेपत्ता असल्याची तक्रार चिंचवड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. त्या दिशेने चिंचवड पोलीस आणि गुन्हे शाखा युनिट दोन हे समांतर तपास करत होते. गुन्हे शाखा युनिट दोन चे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक गणेश माने यांना आरोपी हे चिखली परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्यांना ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.
