पुणे : युक्रेनमध्ये पुण्यातील ७७ विद्यार्थी अडकले असून त्यांना तेथून मायदेश परत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. महाविद्यालयाच्या वसतिगृहात राहत नसल्याने महाविद्यालय किंवा विद्यापीठाकडून कोणत्याही प्रकारची जबाबदारी घेण्यात आलेली नाही, सुपर मार्केट बंद केली जात असल्याने जेवणाची आबाळ होत आहे, सुरक्षिततेच्या कारणास्तव बंकरमध्ये लपण्याच्या सूचना भारतीय दूतावासाकडून देण्यात आल्या आहेत, गेल्या दोन दिवसांपासून आमचा संपर्क झालेला नाही, अशा एक-ना-अनेक व्यथा युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून स्थापन करण्यात आलेल्या नियंत्रण कक्षात दूरध्वनीवरून तसेच ई-मेलद्वारे शुक्रवारी व्यक्त केल्या.

 दरम्यान, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उर्वरित ग्रामीण भागातील नागरिक किंवा विद्यार्थ्यांची माहिती देण्यासाठी जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालयातील ०२०-२६१२३३७१ हा संपर्क क्रमांक आणि controlroompune@gmail.com   हा ई-मेल उपलब्ध करून देण्यात आला आहे, असेही जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी सांगितले.

नागपूरमधील पाच विद्यार्थी..  

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नागपूर : युक्रेनमध्ये युद्ध सुरू असून तेथे शिक्षणासाठी गेलेल्यांमध्ये नागपूर जिल्ह्यातील पाच विद्यार्थ्यांचा समावेश आहे. विदर्भात ही संख्या चाळीसहून अधिक असल्याची माहिती आहे. नागपूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांमध्ये पीयूष गोमासे, तनुजा खंडाळे, संजय सोनटक्के, हिमांशू पवार, रविना थाकित या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. त्यांची माहिती केंद्र सरकारला देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे गोंदिया जिल्ह्यातील तीन, चंद्रपूर जिल्ह्यातील सहा, अकोला जिल्ह्यातील चार, बुलढाणा जिल्ह्यातील सहा, अमरावती जिल्ह्यातील ८ आणि यवतमाळ जिल्ह्यातील सहा व इतर जिल्ह्यातील दोन विद्यार्थ्यांचा समावेश आहे. ही संख्या वाढण्याची शक्यता आहे.