अर्ज न भरल्याचा परिणाम

पुणे : जिल्ह्यात नुकत्याच १७६ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी मतदान पार पडले. या निवडणुकीमध्ये सरपंचपदाची निवड थेट जनतेमधून होणार आहे. मात्र, जिल्ह्यातील पाच ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपदासाठी कोणीही अर्ज न भरल्याने हे पद रिक्त राहिले आहे. तर, ग्रामपंचायत सदस्यपदाच्या ७९ जागा रिक्त राहिल्या आहेत.

जिल्ह्यातील २२१ ग्रामपंचायतीपैकी ४५ ग्रामपंचायतीच्या निवडणुका या बिनविरोध झाल्या, तर १७६ ग्रामपंचायतींसाठी मतदान रविवारी झाले. जिल्ह्यातील ग्रामपंचायत सदस्य पदाच्या १०६२ जागांसाठी तब्बल ३३१३ उमेदवार रिंगणात होते. सरपंच पदाच्या १६७ जागांसाठी ५१९ उमेदवार रिंगणात होते. एका बाजुला बहुतेक गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीसाठी चुरस पहायला मिळाली. मात्र, दुसरीकडे ७९ जागांसाठी उमेदवारी अर्जच न आल्याने हे पद रिक्त राहिले आहे. निवडणुकीसाठी कोणी अर्ज भरले नाहीत, तर काहींचे अर्ज बाद झाले. यामुळे सदस्य पद रिक्त राहिले आहे. आता पोटनिवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणुक आयोगाकडून जाहीर होईल. त्यानंतरच या जागांसाठी निवडणुक प्रक्रिया पार पाडली जाईल, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

पद रिक्त राहिलेली गावे

सरपंच पदासाठी भोर तालुक्‍यातील दोन गावे, दौंडमधील एक, जुन्नर आणि मुळशीतील प्रत्येकी एका गावाचा समावेश आहे. तर, ग्रामपंचायत सदस्य पदासाठी वेल्हा तालुक्‍यातील १८, भोरमधील २२, दौंडमधील एक, जुन्नरमधील १६, आंबेगावमधील आठ, खेडमधील दोन, मावळातील एक आणि मुळशीमधील ११ ग्रामपंचायत सदस्य पदे रिक्त आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उद्या मतमोजणी

जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी झालेल्या मतदानाची मंगळवारी (२० डिसेंबर) मतमोजणी होणार आहे. वेल्हा तालुक्यात जुनी पंचायत समिती सभागृह, भोरमध्ये औद्योगिक प्रशिक्षण संस्था, दौंडमध्ये तहसील कार्यालय, बारामतीमध्ये नवीन प्रशासकीय इमारत, तिसरा मजला, इंदापूरात शासकीय धान्य गोदाम कालठण रस्ता, जुन्नरमध्ये तलाठी सभागृह, आंबेगावात तहसील कार्यालय, खेडमध्ये हुतात्मा शिवराम हरी राजगुरू तालुका क्रीडा संकुल तिन्हेवाडी, शिरूरमध्ये नवीन प्रशाकीय इमारत, मावळात संजय गांधी शाखा इमारत, मुळशीत सेनापती बापट सभागृह आणि हवेली तालुक्यातील मोजणी शहरातील शुक्रवार पेठेतील हवेली तहसील कार्यालय येथे सकाळी दहा वाजता मतमोजणी होणार आहे.