स्वत:चे आयुष्य अंध:कारमय असताना आपल्या बरोबरच्या मुलांच्या आयुष्यात प्रकाश देतोय वाशिममधील आठ वर्षांचा चेतन उचितकर! गावोगाव गाण्याचे कार्यक्रम करून मिळणाऱ्या मानधनातून चेतनने वाशिममधील गावांमध्ये सौर कंदिलांचे वाटप केले आहे.
चेतन उचितकर हा वाशिममधल्या केकतउमरा गावातील. स्वत: जन्मापासून अंध. मात्र, कमालीचा सकारात्मक!  आत्महत्या, नेत्रदान या विषयांवर चेतन गावोगावी फिरून गाणी आणि भाषणांमधून लोकांना सकारात्मक दृष्टी देतो. एकीकडे नैराश्याने ग्रासलेले लोक आणि आपल्यापेक्षा वयाने मोठय़ा लोकांना गाण्यातून सहजपणे आशा देऊन जाणारा चेतन हे दृश्य महाराष्ट्रातील अनेक गावांतील लोकांनी आतापर्यंत पाहिले असेल.  वयाच्या सहाव्या वर्षांपासून सुरू झालेल्या या उपक्रमामध्ये चेतनने आतापर्यंत २४ जिल्ह्य़ांमध्ये १३७ कार्यक्रम केले आहेत. सध्या दिशा फाऊंडेशनच्या माध्यमातून नेत्रदानावर जागृती करण्यासाठी चेतनचे कार्यक्रम सुरू आहेत. सध्या चौथीत शिकत असलेल्या चेतनचे ब्रेल लिपीतून घरच्याघरी शिक्षण सुरू आहे. त्या शिवाय गाण्याचे आणि विविध वाद्यांचे शिक्षणही सुरू आहे.
चेतनच्या कार्यक्रमातून मिळालेल्या निधीतून उचितकर कुटुंबीयांनी चेतनच्याच वयाच्या मुलांना वेगवेगळ्या माध्यमातून मदत केली आहे. वाशिममध्ये भारनियमन असलेल्या गावांतील घरांमध्ये मुलांना अभ्यास करण्यासाठी अडचणी येऊ नयेत म्हणून दिवाळीमध्ये सौरकंदिलांचे वाटप त्यांनी केले आहे. गरजू मुलांना गणवेशांचे वाटप, शालेय साहित्याचे वाटप असे उपक्रम त्यांनी राबवले आहेत. चेतनचे वडील पांडुरंग उचितकर हे शेतकरी आहेत. आपले रोजचे सर्व काम सांभाळून चेतनला गावोगावी फिरवण्याची जबाबदारी त्यांनी पेलली आहे. चेतनचे गाण्याचे गुरू परवीन कठाळे यांची त्यांना साथ आहे.
पांडुरंग उचितकर यांनी सांगितले, ‘‘चेतनला विशेष शिक्षक येऊन शिकवतातच. मात्र, त्याचे गाण्याचे शिक्षणही सुरू आहे. सुट्टी आणि अभ्यास सांभाळून आम्ही गावोगावी कार्यक्रम करतो. चेतनला पूर्वीपासून रेडिओ ऐकायला आवडतो. रेडिओवरील कार्यक्रमांमधून विविध विषयांचे तो मुद्दे काढतो आणि भाषणे तयार करतो. मिळालेल्या मानधनातून आम्ही विद्यार्थ्यांना जमेल तशी मदत करत असतो. चेतनही त्याला खाऊसाठी मिळालेले, बक्षिसाचे पैसे त्यासाठी देतो. त्याला आजपर्यंत १३५ पुरस्कार मिळाले आहेत.’’