राज्यात करोनाचा संसर्ग अत्यंत झपाट्याने वाढताना दिसत आहे. मुंबई व पुणे या दोन्ही महत्वाच्या शहरांमधील करोनाबाधितांची संख्या कमालीची वाढत आहे. शिवाय, या ठिकाणी करोनामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्येत देखील वाढ होत आहे. आज पुणे शहराता करोनाचा उद्रेक झाल्याचे दिसून आले, दिवसभरात तब्बल ८२२ नवे करोनाबाधित आढळले तर १९ जणांचा करोनाने बळी घेतला.

पुणे शहरातील करोनाबाधितांची एकूण संख्या  १५ हजार ६०२ वर पोहचली आहे. तर  आज अखेर ५९१ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. करोनावर उपचार घेणार्‍या ४८६ रुग्णांची तब्येत ठणठणीत असल्याने, आज त्या सर्वांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे आज अखेर एकूण ९ हजार ११९ रुग्ण करोनामुक्त झाले असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागा मार्फत देण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात आज  नव्याने १६५ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर दोघांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे आज ८५ जण करोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरातील एकूण करोनाबाधित रुग्णांच्या संख्येने अडीच हजारांचा टप्पा पार केला असून, २ हजार ५६५ एवढी एकूण संख्या झाली आहे. यापैकी, १ हजार ६८५ जण करोनामुक्त झालेले आहेत. त्याचबरोबर ७० जणांचा मृत्यू देखील झालेला आहे. ही आकडेवारी शहरी आणि ग्रामीण भागातील आहे.

महाराष्ट्रात गेल्या २४ तासात ५ हजार ३१८ नवे करोना रुग्ण आढळले आहेत. तर १६७ मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यात जे १६७ मृत्यू गेल्या चोवीस तासात नोंदवले गेले त्यातले ८६ मृत्यू मागील ४८ तासांमधले आहेत. तर ८१ मृत्यू मागील कालावधीतले आहेत. राज्यातील मृत्यूदर ४.५७ टक्के इतका आहे. मागील २४ तासात ४४३० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आजपर्यंत ८४ हजार २४५ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण म्हणजे रिकव्हरी रेट ५२.९४ टक्के इतके झाले आहे.