पुणे : पुरोगामी विचारांचा वारसा असलेल्या पुण्यात आंतरजातीय विवाह केल्याने एका कुटुंबाला समाजातून २३ वर्षांपूर्वी जातपंचायतीने बहिष्कृत केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. समाजात परत घेण्यासाठी सव्वा लाख रुपये दंड मागितल्या प्रकरणी श्री गौड ब्राह्मण समाजाच्या जात पंचायतीतील पंचांसह आठ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

याबाबत प्रकाश नेमीचंद डांगी (वय ४६, रा. हरपळे गल्ली, फुरसुंगी, हडपसर) यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.  या प्रकरणी ताराचंद काळूराम ओझा (रा. गंज पेठ), भरत नेमीचंद मेवाणी (रा. अरण्येश्वर), मोतीला भोमाराम  शर्मा डांगी (रा. खिवाडा, जि. पाली, राजस्थान), प्रकाश लालूराम बोलद्रा उर्फ शर्मा (रा. पद्मावती), संतोष उणेचा (रा. भवानी पेठ), बाळू शंकरलाल डांगी (रा. पाषाण), भवरलाल डांगी (रा. मारवाड जंक्शन, राजस्थान), हेमाराम ओझा (रा. सिनला, जोधपूर, राजस्थान) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी प्रकाश डांगी श्री गौड ब्राह्मण समाजातील असून ते रिक्षाचालक आहेत. १९९८ मध्ये त्यांनी आंतरजातीय विवाह केला होता. त्यामुळे त्यांना समाजातून बहिष्कृत करण्यात आले होते. समाजाकडून बांधण्यात येणाऱ्या मंदिराचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या बैठकीसाठी ते गेले होते. बिबवेवाडीतील एका मंदिरात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी पंचांनी डांगी यांना मंदिरातील बैठकीत कसा आला, तुला समाजातून बहिष्कृत करण्यात आले आहे, तू निघून जा, असे सांगितले. निमंत्रण पत्रिकेत त्यांचे नाव नव्हते. समाजाच्या विविध कार्यक्रमांचे निमंत्रण डांगी यांना देण्यात आले नव्हते. पद्मावतीतील एका सभागृहात स्नेहमेळाव्याचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. त्याचे निमंत्रण डांगी यांना देण्यात आले नव्हते. समाजातील प्रत्येक कार्यक्रमापासून डांगी यांना जाणीवपूर्वक दूर ठेवण्यात आले होते. डांगी यांनी समाजात परत घ्या, असे पंचांना सांगितले. समाजाचे अध्यक्ष मोतीला शर्मा, भरत मावाणी यांच्याकडे अर्ज केला होता. समाजात पुन्हा यायचे असेल तर एक लाख २५ हजार रुपये दंड मागण्यात आला. अखेर डांगी यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानुसार २०१६ च्या सामाजिक बहिष्कार प्रतिबंधक कायदा कलम ६ आणि ७ नुसार तसेच भारतीय दंडसंहिता कलम  ३४ नुसार पंचांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 9 booked for socially boycotting family for 23 years following inter caste marriage in pune zws
First published on: 26-01-2023 at 04:27 IST