पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या प्रारूप प्रभागरचनेवर ४२ हरकती व सूचना आल्या आहेत. बुधवारी एकाच दिवशी ३२ हरकती आल्या आहेत. हरकती व सूचना आज गुरुवारी दुपारी तीनपर्यंत स्वीकारण्यात येणार आहेत.
महापालिकेने २२ ऑगस्टला चार सदस्यीय पद्धतीने ३२ प्रभागांची प्रारूप रचना जाहीर केली. प्रारूप प्रभागरचनेचे नकाशे महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत. तसेच, महापालिका भवनातील वाहनतळामध्येही लावण्यात आले आहेत. प्रारूप प्रभागरचनेवर आजपर्यंत एकूण १७ हरकती व सूचना प्राप्त झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या नेत्या, माजी महापौर मंगला कदम यांनीही हरकत घेतली आहे. हरकती व सूचना गुरुवारी दुपारी तीनपर्यंत महापालिका भवनातील तळमजल्यावरील निवडणूक कार्यालयात लेखी स्वरूपात स्वीकारण्यात येणार आहेत. त्यानंतर हरकती व सूचना स्वीकारल्या जाणार नाहीत, असे निवडणूक विभागाचे सहायक आयुक्त अविनाश शिंदे यांनी सांगितले.
एक गठ्ठा हरकती स्वीकारण्यास नकार
चिखली गावठाण, रिव्हर रेसिडन्सी, कुदळवाडी, बोऱ्हाडेवाडी, जाधववाडी या प्रभाग क्रमांक दोनमधील एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता बुधवारी तब्बल ९०० हरकती घेऊन आला होता. मात्र, निवडणूक विभागाने एक गठ्ठा हरकती स्वीकारण्यास नकार दिला. एका अर्जावर चार ते पाच हरकती घेता येऊ शकतात. किंवा प्रत्येक व्यक्तीने एकच हरकत द्यावी, असे आवाहन निवडणूक विभागातील अधिकाऱ्यांनी केले आहे.
प्रधान सचिव प्रवीण दराडे सुनावणी घेणार
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग रचनेवरील हरकतींवर सुनावणी घेण्यासाठी प्रधान सचिव प्रवीण दराडे यांची राज्य शासनाने प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. पाच ते १२ सप्टेंबरदरम्यान हरकतींवर सुनावणी घेतली जाणार आहे. त्यानंतर अंतिम प्रभागरचनेची प्रक्रिया सुरू होणार आहे. अंतिम प्रभागरचना प्रसिद्ध झाल्यानंतर आरक्षण निश्चिती होणार आहे.
