पुणे : कोथरूड भागातील डीपी रस्त्यावर भरधाव मोटारीच्या धडकेत दुचाकीवरील १२ वर्षीय शाळकरी मुलाचा मृत्यू झाला. अपघातात दुचाकीस्वार आई जखमी झाली. अपघातानंतर घटनास्थळावरून पसार झालेल्या मोटारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अबीर प्रणव पानसे (वय १२, रा. चैतन्य हेल्थ क्लबजवळ, रामबाग काॅलनी, कोथरूड) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. अपघातात दुचाकीस्वार प्रियांका प्रणव पानसे (वय ४४) या जखमी झाल्या. याबाबत प्रियांका यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मोटारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून त्याचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक संदीप पवार यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अबीर कोथरूड परिसरातील एका शाळेत सातवीत शिकत होता. सोमवारी रात्री सव्वाआठच्या सुमारास दुचाकीस्वार प्रियांका यांच्याबरोबर अबीर दुचाकीवरून कोथरूड भागातील डीपी रस्त्यावरून निघाला होता. त्या वेळी शांतिबन सोसायटीकडून आशिष गार्डन चौकाकडे एक मोटार भरधाव निघाली होती. मोटारीने दुचाकीला पाठीमागून धडक दिली. अपघातात प्रियंका आणि अबीर यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना नागरिकांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले. उपचारांदरम्यान अबीरचा मंगळवारी रात्री मृत्यू झाला.
अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. पोलिसांनी शांतिबन सोसायटी ते आशिष गार्डन चौक परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासले आहे. पसार झालेल्या मोटारचालकाचा शोध घेण्यात येत असून, सहायक निरीक्षक संदीप पवार तपास करत आहेत.
रामबाग काॅलनीत शोककळा
पानसे कुटुंबीय रामबाग काॅलनीत राहायला आहेत. प्रियांका या एका बँकेत व्यवस्थापक म्हणून काम करतात. अबीरचा अपघातात मृत्यू झाल्याचे समजताच रामबाग काॅलनीत शोककळा पसरली. प्रियांका मोटार चालविण्याचे प्रशिक्षण घेत होत्या. प्रशिक्षण आटोपून त्या अबीरला घेऊन दुचाकीवरून घरी निघाल्या होत्या. त्या वेळी डीपी रस्त्यावर त्यांना मोटारीने धडक दिली, असे पोलिसांनी सांगितले.
तीन दिवसांत तीन अपघात
शहर परिसरात तीन दिवसांत तीन मुलांचा वेगवेगळ्या अपघातांत मृत्यू झाला. कोंढवा भागात भरधाव मोटारीच्या धडकेत निवृत्ती बाजीराव किसवे (वय १३, रा. कोंढवा) याचा रविवारी (१८ मे) सायंकाळी मृत्यू झाला होता. त्या आधी शनिवारी (१७ मे) दुपारी डंपरच्या चाकाखाली सापडून दुचाकीवरील सहप्रवासी शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याची घटना खराडी भागात घडली. अपघातात अंशुमन अनुपमकुमार गायकवाड (वय ११, रा. केशवननगर, मुंढवा) याचा मृत्यू झाला. त्यानंतर सोमवारी (१९ मे) रात्री कोथरूडमधील अपघातात अबीर पानसे याचा मृत्यू झाला.