पुणे : इमारतीच्या गच्चीत खेळत असताना लहान मुले खाली पडण्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. पुण्यात नुकत्याच अशा दोन घटना घडल्या आहेत. यातील दोन वर्षीय मुलगी आणि १३ वर्षीय मुलाला गंभीर दुखापत झाली होती. त्यांच्यावर वेळीच योग्य उपचार झाल्याने त्यांना जीवदान मिळाले आहे.
पहिल्या घटनेत निवासी इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून १३ वर्षीय मुलगा खाली पडला. त्याला गंभीर दुखापतींसह बेशुद्धावस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. या मुलाच्या शरीराच्या डाव्या बाजूला गंभीर मार लागला होता. त्यात मांडीचे हाड, हात, पाऊल आणि माकडहाड मोडले होते. याचबरोबर अंतर्गत रक्तस्रावासह मणक्याला दुखापत झाली होती. अंतर्गत रक्तस्रावामुळे आणि प्लेटलेटची संख्या कमी झाल्याने मुलाची प्रकृती खालावली होती. पुढील तीन दिवसांत मुलावर अनेक शस्त्रक्रियात्मक उपचार केले गेले. त्यात माकडहाड आणि पावलाच्या दुखापतीवर स्वतंत्र शस्त्रक्रिया, पाठीच्या मणक्यावरील एक स्वतंत्र शस्त्रक्रिया, मांडीचे लांब हाड, हाताचे हाड, कोपराला झालेली दुखापत यांच्यासाठी वेगवेगळ्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यानंतर त्याची प्रकृती स्थिर झाली.
दुसऱ्या घटनेत एका निवासी इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील गच्चीतून दोन वर्षांची मुलगी खाली पडून गंभीर जखमी झाली. तिला रुग्णालयात आणले त्यावेळी ती अर्धवट शुद्धीत होती. तिला श्वास घेणेही कठीण झाले होते. डॉक्टरांनी तिला तत्काळ व्हेंटिलेटरवर ठेवले आणि तिची प्रकृती स्थिर केली. तिच्या तपासणीत मेंदूला अनेक जखमा झाल्याचे दिसून आले. तपासणीतील निष्कर्षावरून त्वरित शस्त्रक्रियेची आवश्यकता नसल्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला. कारण लहान मुलांमध्ये रक्तस्राव वाढत नसेल, तर शस्त्रक्रियेमुळे कधीकधी फायद्यापेक्षा नुकसान जास्त होण्याची शक्यता असते. पाचव्या दिवशी तिची प्रकृती थोडी स्थिर वाटत असतानाच, ती अचानक फिट येण्याच्या स्थितीत गेली. ही अवस्था आटोक्यात आणण्यासाठी डॉक्टरांना तिला ४८ तास बेशुद्धावस्थेत ठेवावे लागले. पुढील ४८ तासांमध्ये तिची स्थिती सुधारू लागली आणि हळूहळू ती शुद्धीत येऊ लागली. आता तिची प्रकृती सुधारत आहे.
दोन वर्षीय मुलीला रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिच्या मेंदूला अनेक जखमा झाल्याचे दिसून आले. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्यामुळे मेंदूला सूज येऊन तंतू फाटले होते. हे कितीही गंभीर दिसत असले तरी, तपासणीत समोर आलेल्या बाबींवरून त्वरित शस्त्रक्रियेची आवश्यकता नाही, असे आमचे मत बनले. लहान मुलांमध्ये रक्तस्राव वाढत नसेल, तर शस्त्रक्रियेमुळे कधीकधी फायद्यापेक्षा नुकसानच जास्त होण्याची शक्यता असते. हा निर्णय तिच्या उपचारात महत्त्वाचा ठरला. – डॉ. सचिन शहा, बालरोगतज्ज्ञ
तेरा वर्षीय मुलाच्या मणक्याला दुखापत झाली होती. मात्र डोक्याला झालेली इजा मेंदूची शस्त्रक्रिया करण्याएवढी गंभीर नव्हती. पुढील तीन दिवसांत मुलावर एकापाठोपाठ एक असे अनेक शस्त्रक्रियात्मक उपचार केले गेले. जखमेवरून मृत उती काढून टाकण्यासाठी वुंड डिब्राइडमेंट ही शेवटची मुख्य प्रक्रिया पार पाडण्यात आली. रक्तस्राव आणि संसर्गाचा धोका कमी करण्यासाठीही उपचार करण्यात आले. – डॉ. विनय कुमार गौतम, अस्थिशल्यचिकित्सक