पुणे : आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरुन धनकवडीतील राजारामबापू सहकारी बँकेच्या शाखा व्यवस्थापकासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत प्रेमला बजरंग शिंदे (वय ४७, रा. शिवदर्शन अपार्टमेंट, आंबेगाव बुद्रुक) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, राजारामबापू बँकेचे व्यवस्थापक रामनाऊ नामदेव कोंढरे, सोमनाथ कोंढरे यांच्यासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रेमला शिंदे यांचे पती बजरंग यांनी कर्ज घेतले होते. कोंढरे यांनी कर्जावर घेतलेल्या रकमेपेक्षा जादा रक्कम मागितली होती. बजरंग यांना शिवीगाळ करुन त्यांना त्रास दिला होता. कोंढरे यांनी पतीला मानसिक त्रास दिल्याने त्यांनी १० नोव्हेंबर रोजी इमारतीच्या छतावर गळफास घेऊन आत्महत्य केली, असे प्रेमला शिंदे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. बजरंग शिंदे यांनी त्यांच्या मोबाइलवरुन पत्नीला संदेश पाठविला होता. राजारामबापू सहकारी बँकेच्या व्यवस्थापकाने दिलेल्या त्रासामुळे आत्महत्या करत असल्याचे संदेशात म्हटले होते. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली होती. शिंदे यांच्या पॅण्टच्या खिशात चिठ्ठी सापडली होती. चिठ्ठीत शिंदे यांनी उल्लेख केला होता. सहायक पोलीस निरीक्षक पाटील तपास करत आहेत.




हेही वाचा >>>पुणे: नवले पुलाजवळ तरुणाचा डोक्यात दगड घालून खून
दिवाळी साजरी करु नको….
बजरंग शिंदे एका बांधकाम व्यावसायिकाकडे कामाला होते. तीन महिन्यांपूर्वी त्यांची नोकरी गेली होती. तेव्हापासून ते नैराश्यात होते. बँक व्यवस्थापक कोंढरे यांनी पैसे देण्यासाठी तगादा लावला होता. दिवाळी साजरी करु नको, पण आमचे पैसे परत दे, असे त्यांनी सांगितले होते. त्यांच्या त्रासामुळे आत्महत्या करत असल्याचे बजरंग शिंदे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिट्ठीत म्हटले होते.