पिंपरी : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) आणि पिंपरी-चिंचवड महापालिका यांच्याकडून मंजूर परवानगीपेक्षा अधिक मजल्यांच्या बांधकामासाठी परवानगी असल्याचे दाखवून ग्राहकांकडून पाच कोटी ३७ लाख रुपये घेत कोणतेही बांधकाम न करता फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाणेर येथे हा प्रकार घडला.

निखिल ज्ञानेश्वर फालक (वय ३२, रा. हिंजवडी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका महिलेसह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी बांधकाम प्रकल्पासाठी पीएमआरडीएकडून चार मजल्यांची परवानगी घेतली आहे. तसेच दुसऱ्या एका प्रकल्पासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेची पाच मजल्यापर्यंत बांधकाम करण्याची परवानगी घेतली आहे. असे असताना त्यांनी बांधकाम प्रकल्पाबाबत पूर्ण माहिती न देता ग्राहकांना दहा मजल्यापर्यंत परवानगी प्राप्त करण्यात येत असल्याची खोटी माहिती दिली. फालक आणि इतर व्यक्तींना दोन, पाच, नऊ आणि दहाव्या मजल्यावरील सदनिका व दुकाने विक्री करण्याचे आश्वासन दिले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फालक आणि इतर ग्राहकांकडून पाच कोटी ३७ लाख ५५ हजार ७५९ रुपये घेतले. आरोपींनी ग्राहकांना रक्कम स्वीकारल्याच्या पावत्या, वाटपपत्र दिले. मे २०२० पर्यंत ताबा देण्याचे तोंडी आश्वासन देण्यात आले होते. प्रत्यक्षात कोणतेही बांधकाम पूर्ण न करता फालक आणि इतर ग्राहकांकडून घेतलेली रक्कम परत न करता तसेच गुंतवणूकदार यांच्याशी कोणताही रजिस्टर नोंदणी विक्री करार न करता रक्कम स्वत:च्या फायद्यासाठी वापरून फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. फौजदार कांदे तपास करीत आहेत.