बारामती : बारामती-इंदापूर रस्त्यावर एसटी बसमध्ये एकाने कोयत्याने प्रवाशावर हल्ला केल्याचा प्रकार पाहिल्यानंतर धक्का बसल्याने आणि या प्रकारानंतर घाबरून पळताना पडल्याने बेशुद्ध झालेल्या महिलेचे बुधवारी निधन झाले.
वर्षा रामचंद्र भोसले (वय ४३, रा. यादगार सिटी, बारामती) असे निधन झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बारामती आगाराची बस एक ऑगस्ट रोजी सकाळी पावणेदहा वाजता बारामतीहून इंदापूरच्या दिशेने निघाली होती. बसमध्ये असलेल्या अविनाश शिवाजी सगर (वय २१, मूळ रा. लातूर, सध्या रा. सोनगाव, ता. बारामती) याने शेजारच्या सीटवर बसलेल्या पवन अनिल गायकवाड या तरुणावर कोयत्याने वार केले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे बसमध्ये असलेले प्रवासी भयभीत झाले. बसमध्ये वर्षा भोसले यांच्यासह काही महिला आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने होत्या. बसमध्ये सुमारे ६० प्रवासी होते.
या प्रकारानंतर बसमध्ये गोंधळ उडाला. काही प्रवाशांनी चालू बसमधून मागच्या बाजूने उड्या मारल्या. प्रसंगावधान राखून चालकाने बस काटेवाडी येथील उड्डाणपुलावर थांबवली. त्या वेळी पवन गायकवाड हा जीव वाचवण्यासाठी पळाला. सगर त्याच्या मागे गेला. अचानक घडलेल्या या घटनेने भोसले यांना धक्का बसला. त्यादेखील जीव वाचवण्यासाठी पळू लागल्या. पळताना जमिनीवर कोसळल्या. यामध्ये त्या जखमी होऊन बेशुद्ध पडल्या. त्यांना बारामतीतील शासकीय रुग्णालय उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. बुधवारी त्यांचे निधन झाले.
दरम्यान, या प्रकारानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सगर याने स्वत:वरही कोयत्याने वार केले होते. पोलिसांनी त्याला पकडून ताब्यात घेतले. सगर याला अटक करण्यात आली आहे. सगर आणि गायकवाड यांच्यात कोणत्या कारणामुळे वाद झाला, याबाबत तपास करण्यात येत असल्याचे बारामती पोलिसांनी सांगितले.
वर्षा भोसले यांचे वालचंदनगर येथे माहेर असून, त्या बसमधून माहेरी निघाल्या होत्या. मात्र, त्यांचे निधन झाल्याने परिसरात शोककळा पसरली. भोसले यांच्या मागे पती न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमधील प्रा. रामचंद्र भोसले, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. भोसले कुटुंब हे मूळचे इंदापूर तालुक्यातील काटी येथील रहिवासी आहे.
दरम्यान, बारामती तालुक्यात कोयत्याने वार केल्याच्या घटना यापूर्वी अनेकदा घडल्या आहेत. बारामती शहरातील महाविद्यालयाच्या आवारात एका विद्यार्थ्याचा कोयत्याने वार करून खून करण्यात आल्याचा प्रकार नुकताच घडला होता.