पिंपरी- चिंचवड: पिंपळे गुरव मध्ये डॉक्टर ने मेडिकल दुकानदाराची फसवणूक केल्याचं प्रकरण उजेडात आलं आहे. डॉ. मयूर संजय काठोळे अस फसवणूक करणाऱ्या डॉक्टरचे नाव आहे. त्यांच्यासह वडील संजय शंकर काठोळे, दिगंबर चंद्रकांत गवळी आणि बळीराम आनंदराव घोडके यांच्यावर ही गुन्हा दाखल झाला आहे. किरण किशोर संचेती यांनी याबाबत सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
सविस्तर माहिती अशी की, किरण किशोर संचेती यांची डॉ. मयूर संजय काठोळे यांनी ९५ लाखांची फसवणूक केल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. ०७ जानेवारी २०२३ ते आजतागायत हे प्रकरण घडलेलं आहे. डॉ. मयूर संजय काठोळे यांचं काटेपुरम चौकाजवळ रुग्णालय आहे.
रुग्णालयात तक्रारदार यांना मेडिकल दुकान सुरू करण्यासाठी काठोळे यांनी ८० लाख रुपये घेतले होते. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. काही महिने हे मेडिकल चाललं. पण, रुग्णालय चालत नव्हतं. अखेर ते आता बंद अवस्थेत आहे.
काही महिन्यांच्या काळात रुग्णालयात दाखल केलेल्या रुग्णाच्या उपचारासाठी १५ लाख रुपयांची औषधे देखील तक्रारदार यांनी दिली होती. अशी एकूण ९५ लाखांची फसवणूक केल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. अखेर हे प्रकरण सांगवी पोलिसांपर्यंत पोहचल आहे. या प्रकरणी मध्यरात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा सर्व प्रकार घोडके कॉप्लेक्स येथे घडला आहे. या प्रकरणी सांगवी पोलीस अधिक तपास करत आहेत.