पुणे : नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार नव्या स्वरूपाच्या पदवी अभ्यासक्रमाची अंमलबजावणी पुढील शैक्षणिक वर्षांपासून सुरू होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. राज्यातील सर्व विद्यापीठांमध्ये पुढील शैक्षणिक वर्षांपासून मल्टिपल एन्ट्री आणि मल्टिपल एक्झिट पर्यायासह चार वर्षांचा (आठ सत्रांचा) बहुविद्याशाखीय पदवी अभ्यासक्रम राबवण्याचे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण विभागाने दिले आहेत.

उच्च व तंत्रशिक्षण विभागाने मुंबई विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती. या समितीच्या शिफारसी शासनाने स्वीकारल्यानंतर अंमलबजावणी, अभ्यासक्रमांचे स्वरूप, श्रेयांक रचना, मूल्यमापन या बाबतचे निर्देश शासन निर्णयाद्वारे देण्यात आले. नव्या रचनेनुसार तीन वर्षांचे १२० श्रेयांक पूर्ण केल्यावर विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र मिळेल. चार वर्षांचे १६० श्रेयांक पूर्ण केल्यावर ऑनर्स किंवा संशोधन पदवी दिली जाईल. प्रत्येक सत्रातील ४० टक्के अभ्यासक्रम हा स्वयम् प्लॅटफॉर्मवरून ऑनलाइन पद्धतीने शिकण्याची मुभा राहणार आहे. या अभ्यासक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात दहा श्रेयांकांचा रोजगारक्षम जोड अभ्यासक्रम आणि कार्यप्रशिक्षण (इंटर्नशीप) समाविष्ट आहे. तसेच पाच वर्षांच्या एकात्मिक अभ्यासक्रमासाठी दोनशे श्रेयांक प्राप्त करावे लागतील. अभ्यासक्रमात उत्तीर्ण होण्यासाठी किमान ४० टक्के गुण मिळवणे अनिवार्य आहे. 

 विद्यार्थ्यांना काही कारणास्तव शिक्षण सोडून काही काळाने पुन्हा शिक्षण घेण्याची सुविधा मल्टिपल एंट्री-मल्टिपल एक्झिटमुळे उपलब्ध होईल. मात्र विद्यार्थ्यांना पुन्हा प्रवेशित करून घेण्यासाठीचे निकष विद्यापीठांना तयार करावे लागणार आहेत. तसेच नव्या अभ्यासक्रमांच्या अंमलबजावणीसाठी राज्य विद्यापीठे, स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे, मुक्त विद्यापीठांना नियमावली, परिनियम तयार करण्याची मुभा असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. 

चार वर्षांच्या पदवीचे स्वरूप

  • चार वर्षांच्या ऑनर्स अभ्यासक्रमात अंतिम वर्षांतील दोन्ही सत्रांमध्ये विद्यार्थ्यांना एखाद्या विषयात स्पेशलायझेशन आणि इंटर्नशीप. त्यासाठी वीस श्रेयांक.
  • चार वर्षांच्या संशोधन अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षांतील दोन्ही सत्रांमध्ये संशोधन प्रकल्प, प्रबंध, कार्यशाळा आणि कार्यप्रशिक्षणासाठी वीस श्रेयांक.
  • १२०० तासांच्या शिक्षणानंतर ४० श्रेयांक

पदव्युत्तर पदवीचे स्वरूप

  • पदवी अभ्यासक्रमानंतर ४० श्रेयांकांचा एका वर्षांचा, दोन सत्रांचा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम – तीन वर्षांच्या पदवीनंतर दोन वर्षे, चार सत्रांचा, ८० श्रेयांकांचा पूर्ण वेळ पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम. द्वितीय वर्षांत संशोधन आवश्यक.
  • चार वर्षांच्या ऑनर्स किंवा संशोधन पदवी अभ्यासक्रमानंतर एक वर्षांच्या अभ्यासक्रमाद्वारे पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम

श्रेयांक आणि कालावधी

अभ्यासक्रम         श्रेयांक        कालावधी

प्रमाणपत्र         ४०        एक वर्ष, दोन सत्रे 

पदविका              ८०          दोन वर्ष, चार सत्रे

पदवी                  १२०       तीन वर्षे, सहा सत्रे

पदवी ऑनर्स         १६०       चार वर्षे, आठ सत्रे

संशोधन पदवी       १६०       चार वर्षे, आठ सत्रे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अभियांत्रिकी पदवी  १६०       चार वर्षे, आठ सत्रे