पिंपरी- चिंचवड: पिंपरी- चिंचवड शहरात कुत्र्यांची दहशत वाढली आहे. दिवसेंदिवस कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. आज पहाटे पाच च्या सुमारास चिखली मोरे वस्ती परिसरात कुत्र्यांनी कामावर जाणाऱ्या तरुणाच्या हाताचा चावा घेऊन ओढून घेऊन जाण्याचा प्रयत्न केला आहे. ही सर्व घटना सीसीटीव्ही कैद झाली आहे.

सविस्तर माहिती अशी , मोरे वस्ती साने कॉलनीत कुत्र्यांच्या टोळक्यांची मोठी दहशत निर्माण झाली आहे. सात कुत्र्यांच टोळकं एकट्या दिसणाऱ्या व्यक्तींवर हल्ला करत आहे. आज पहाटे पाच च्या सुमारास कामावर जात असताना बेसावध असलेल्या व्यक्तीवर कुत्र्यांच्या टोळक्याने हल्ला चढवला. त्या व्यक्तीच्या हाताला कुत्र्यांनी चावा घेतला आहे. घटनेत तरुण जखमी झाला आहे. सात कुत्र्यांनी घेराव घालून पुन्हा चावा घेण्याचा प्रयत्न केला. तरुणाने जीव वाचवण्यासाठी फ्लेक्स बोर्ड आणि दुचाकीचा आसरा घेतला, टोळकं जास्त आक्रमक होत असल्याने त्यांच्या अंगावर दुचाकी ढकलली.

कुत्र्यांचा आवाज आणि तरुणाचा आवाज ऐकून काही जण बाहेर आले. पणे कुत्र्याचं टोळकं तिथंच येरझाऱ्या घालत होत. कुत्र्यांच्या या टोळक्यांची दहशत आणि धास्ती नागरिकांनी घेतली आहे. सकाळी सकाळी उठून शतपावली करणाऱ्या जेष्ठ नागरिक, तरुण भीतीच्या सावटाखाली आहेत. घटनेमुळे कुत्र्यांची दहशत पसरली आहे. महानगर पालिका प्रशासनाने तात्काळ घटनेची दखल घेऊन मोरेवस्ती चिखली परिसरातील कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याबाबत नागरिकांनी मागणी केली आहे.